- गोंदियाच्या दासगाव येथील घटना : संतप्त गावकर्यांकडून चक्काजाम, गावात तणाव
गोंदिया,
Illegal sand transportation जिल्ह्यात अवैध रेती उपसा आणि वाहतुकीने कळस गाठला असून, या जीवघेण्या वाहतुकीने आज एका महिलेचा बळी घेतला. तालुक्यातील दासगाव येथे शुक्रवारी दुपारी अवैध रेती वाहून नेणार्या एका भरधाव टिप्परने मुलीसह स्कूटीने जात असलेल्या महिलेच्या स्कूटीला धडक दिली. या भीषण अपघातात सदर महिलेच्या अंगावरून टिप्परचा चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाली. रामेश्वरी धनलाल नागपुरे (४५) रा. कटंगी कला/गोंदिया असे मृत महिलेचे नाव असून वैष्णवी नागपूरे असे गंभीर जखमी मुलीचे नाव आहे. या घटनेनंतर गावकर्यांनी अवैध वाळू वाहतूक बंद करण्याची मागणी करत रस्ता रोखून धरला त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Illegal sand transportation मिळालेल्या माहितीनुसार मृतरामेश्वरी नागपुरे या मुलगी वैष्णवीसोबत स्कूटी क्रमांक एमएच ३५ एबी ७५३७ ने मध्यप्रदेशातील आरंभा येथे आपल्या सासूच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी जात होत्या. दरम्यान, दासगाव येथील मनोरंजन चौक परिसरात रेती भरून येणार्या टिप्पर क्रमांक एमएच ४० बीएच ८०८० च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यावेळी रामेश्वरी या टिप्परच्या चाकाखाली चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मुलगी रस्त्याच्या कडेवर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची बातमी समजताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले. संतापलेल्या ग्रामस्थांनी टिप्पर चालकाला पकडून चांगलाच चोप दिला. तर अवैध रेती वाहतूक तातडीने बंद करण्याची मागणी करत रस्त्यावर टायरची जाळपोळ करून रस्ता जाम केला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी बानकर, तहसीलदार समशेर पठाण आणि अन्य वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत रावणवाडी, दवनीवाडा व पोलिस मुख्यालय कारंजा येथून अतिरीक्त कुमक मागविण्यात आली. दरम्यान, सायंकाळपर्यंत गावात तणावपूर्ण शांतता होती. या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर आता तरी कठोर कारवाई करणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
रात्री उशिरापर्यंत अवैध वाहतूकीची वर्दळ
येथील नागरिकांच्या मते या मार्गावरच किन्ही, महालगाव, तेढवा हे वाळू घाट असल्याने पहाटेपासून या मार्गावर वाळू वाहतूक केली जाते, तर मध्यरात्रीपर्यंत शेकडो टिप्पर व ट्रॅक्टरची वर्दळ असते. गावातील मनोरंजन चौक व बाजार चौकात यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा अवैध वाळू वाहतूकीवर आळावा घालावा व भरधाव वाहनांना नियंत्रित करावे अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.