काळे ढग, रुपेरी रेषा

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
 अग्रलेख 
 
 
chip in human brain सुमारे चार वर्षांपूर्वी, 2022 मध्ये जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या राष्ट्रांच्या जी-20 परिषदेपाठोपाठ कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंधित असलेल्या ‘ग्लोबल पार्टनरशिप ऑफ आर्टिफिशियल इन्टेलिजन्स’ (जीपीएआय) या आंतरराष्ट्रीय जागतिक भागीदारी संघटनेचे अध्यक्षपदही भारताकडे आले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जबाबदार आणि मानवकेंद्रित विकास साधण्याबाबतच्या भारताच्या भरीव कामगिरीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही मान्यता मानली जाते. तरीही, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या आक्रमणाची चिंता दूर झालेली नाही. 2023 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या आक्रमणाबाबत चिंता व्यक्त करणारा सूर उमटला होता. कृत्रिम बुद्धिमत्ता हे संकट आणि की वरदान यावर त्या परिषदेत स्पष्ट एकमत झालेले नाही, परंतु याचा वापर विवेकाने झाला नाही, तर हे संकटच ठरणार यावर मात्र अनेक राष्ट्रांचे एकमत झाले होते. यंत्र आणि तंत्र ही मानवाच्या भौतिक विकासाची साधने हाती लागल्यामुळे बहुतांश समाज तंत्रजीवी होत असून, आता तर मानवी मेंदूकरवी करून घेतली जाणारी अनेक कामे करण्यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता आता सिद्ध झाली आहे. जिथे मानवी मेंदूची क्षमता संपते, तेथे कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता सुरू होते, असे या तंत्राबाबत अभिमानाने सांगितले जाते. जगातील अनेक देशांनी विकासाच्या नव्या वाटचालीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्राधान्याने सुरूदेखील केला असून, नजीकच्या भविष्यात माणसाच्या सहभागाची गरज असलेल्या क्षेत्रांतही कृत्रिम बुद्धिमत्तेला कामाला लावता येईल, असे लक्षणीय संशोधन पूर्ण झाले आहे. जसजशी प्रगतीच्या पुढच्या टप्प्याची प्रतीक्षा सुरू होते, तसतसे तंत्रावलंबित्व वाढत चालल्यामुळे एक दिवस यंत्रांच्या स्वाधीन होऊन, अवयवांकरवी करून घ्यावयाची सारी कामे यंत्रांकरवी करून घेण्याची वेळ येईल आणि माणसाचेच यंत्र होऊन जाईल हा विचार शक्यतेच्या सीमा ओलांडून वास्तवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
 
 

काळे ढग, रुपेरी रेषा 
 
कृत्रिम बुद्धिमत्तेने माणसाच्या मेंदूचे काम बरेचसे हलके केल्यानंतर प्रगतीचा टप्पा माणसाला कोणत्या नव्या विचाराच्या किंवा चिंतेच्या खाईत नेऊन सोडणार आहे, याचा विचार करण्याची ही वेळ आली आहे. कारण, माणसाची कामे सोपी करण्यासाठी यंत्रांच्या विश्वात प्रगती करता करता माणसाचेच यंत्र व्हावे ही कल्पना कालपरवापर्यंत मोठी मनोरंजक वाटत होती. पण ही कल्पना आता केवळ स्वप्नरंजन राहिलेली नाही. मानवी मेंदूमध्ये बसविली जाणारी एक लहानशी चिप मेंदूच्या कामाचा ताण हलका करण्यास समर्थ ठरणार आहे. तशी चिप बसविण्याचा, म्हणजे मानवी मेंदूमध्ये चिपचे प्रत्यारोपण करण्याचा प्रयोग अमेरिकेत यशस्वी झाल्याची घोषणा अमेरिकेतील एक उद्योगपती एलन मस्क यांनी काही वर्षांपूर्वी केली आणि त्याचे पडसाद जगभर उमटले. मस्क यांच्या कंपनीनेच अशी चिप तयार केली आणि ज्या माणसाच्या मेंदूत ही चिप यशस्वीपणे बसविली आहे, त्याची प्रकृती उत्तम असून काही कामे करण्याकरिता ही चिप मेंदूला सहकार्य करू शकणार आहे. मानवी मेंदूमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचेच एक प्रकारे रोपण करणारी ही चिप बसविण्याकरिता अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर लगेचच, म्हणजे केवळ सहा-सात महिन्यांतच अमेरिकेत चिपयुक्त मेंदूचा माणूस तयारही झाला आणि माणसाचे यंत्र होण्याचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्णदेखील झाला.
 
भविष्यात जेव्हा कधी चिप बसविलेल्या मेंदूच्या माणसांची गर्दी होऊ शकेल, तेव्हाची दुनिया कशी असेल याची कल्पना करणे आजच्या घडीला विचारशक्तीच्या पलीकडचे ठरणार आहे. नव्या जगातील माणूस नावाचे हे यंत्र प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचत असतानाच, नैसर्गिक मेंदूच्या कमाल क्षमता सिद्ध करणाèया बुद्धिमान तरुण पिढीचे काय होणार हा प्रश्न आता भयाणपणे समोर उभा राहिला आहे. भविष्याच्या सुरक्षिततेबाबत आश्वस्त असलेल्या तरुणाईला याच तंत्रावलंबित्वाचा फटका बसू लागला आहे. ओरॅकल नावाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीतील तब्बल 12 हजार कुशल भारतीय कर्मचाèयांना एका नव्या पहाटे केवळ एका ई-मेलद्वारे हाती नारळ देऊन नोकरीवरून काढून टाकल्याचा संदेश येतो, तेव्हा नव्या तंत्रावलंबित्वाचे परिणाम सुस्पष्टपणे जाणवू लागतात. म्हणूनच, विकासाची रुपेरी रेषा या भावनेेने ज्या तंत्रज्ञानाकडे पाहिले जात होते, त्या रेषेमागे चिंतेचे काळे ढगदेखील आहेत, ही जाणीव आता गडद होऊ लागली आहे. ओरॅकल नावाच्या कंपनीतील 12 हजार भारतीय कर्मचाèयांवर आदळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड ही तर केवळ एक सुरुवात आहे. जसजशी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील गुंतवणूक वाढत जाईल, तसतशी नैसर्गिक बुद्धिमत्तेची गरज कमी होत जाईल याचे संकेत देणारी ही घटना म्हणजे रुपेरी रेषेमागच्या काळ्या ढगांचे अस्तित्व गडद करणारी ठरणार आहे. ओरॅकल या कंपनीचे भारतात सुमारे 30 हजार कर्मचारी असल्याचे सांगण्यात येते. आपल्या क्षमता सिद्ध करून आपला भविष्यकाळ सुरक्षित करण्याइतपत आश्वस्तता या कर्मचाèयांनी प्राप्त केली होती. मात्र, अचानक एका सकाळी हाती निरोपाचा नारळ मिळाल्यानंतर भविष्याच्या अनिश्चिततेचे सावट दाटते आणि अवघ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाèयांमध्ये असुरक्षिततेच्या जाणिवेची अवकळा दाटते हे चित्र चिंताजनक आहे.
 
मुळात सध्या युद्धस्थितीमुळे सर्वत्र अनिश्चिततेची दाट छाया पसरलेली असताना त्याच्या भयात भर घालणाऱ्या अशा घडामोडींतही दिलाशाची दुसरी बाजू अंधुकपणे उजोडात येताना दिसते, तेव्हा नैराश्याचे गडदपणही काहीसे धूसर होऊ लागते. युद्धाच्या संकटामुळे जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसू लागला असून त्याच्या झळा घराघरापर्यंत पोहोचू लागल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेपासून, खते, औषधे आणि चप्पल-बुटांसारख्या वस्तूदेखील महागाईच्या गर्तेत गटांगळ्या खाऊ लागल्याने, आर्थिक व्यवस्थापनाची चिंता दिवसागणिक गडद होणार आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत बेरोजगारीची कुèहाड कोसळण्यासारखी अन्य चिंताजनक बाब नाही. तरीही, दुसरीकडे मात्र रोजगाराच्या संधींबाबतचे सामान्य चित्र मात्र काहीसे दिलासादायक असल्याची सुखद वार्ता नुकतीच समोर आल्याने, चिंतेच्या काळ्या ढगांची रुपेरी किनार जाणवून देणारी आनंददायी बाब म्हणून त्याकडे पाहावे लागेल. केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या आवधिक बल सर्वेक्षण (पीएलएफएस) या ताज्या वार्षिक अहवालाचे काही निष्कर्ष असे दिलासादायक ठरत आहेत. देशातील सामान्य बेरोजगारी कमी होत असून क्षमतावान समाजघटकांचा श्रमाच्या कामातील सहभाग वाढल्याने अर्थव्यवस्था संकटजन्य परिस्थितीत नाही असा या अहवालाचा निष्कर्ष आहे. महिलांचे उत्पन्न पुरुषांच्या उत्पन्नाच्या तुलनेत सुमारे 31 टक्क्यांनी कमी आहे, पण ते वेगाने वाढत आहे.chip in human brain कदाचित, कामातील सहभागातील महिला व पुरुषांच्या असमानतेमुळे तसे होत असावे. मात्र, जानेवारी ते डिसेंबर 2025 या वर्षात पुरुषांचे वेतन सरासरी 5.80 टक्क्यांनी तर महिलांचे वेतन सरासरी 7.16 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षभरात महिलांच्या श्रमाची सरासरी दैनिक मजुरीदेखील 16 रुपयांनी वाढली आहे. स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात मात्र, महिलांचा सहभाग पुरुषांच्या संख्येच्या तुलनेत काहीसा कमी असून या क्षेत्रात पुरुषांची कमाई महिलांच्या कमाईतून तिप्पट असल्याचा या अहवालाचा निष्कर्ष आहे. विशेष म्हणजे, या वर्षभरात बेरोजगारीचा दर 3.3 टक्क्यांवरून 3.1 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. शिक्षित वर्गातील बेरोजगारी तब्बल अर्धा टक्क्याने कमी झाली असून बेरोजगारीचा दर साडेसात टक्क्यांवर आला आहे आणि युवकांमधील बेरोजगारीदेखील कमी झाली आहे. देशातील 67.8 टक्के लोकसंख्या किमान माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षित असली तरी केवळ 4.20 टक्के लोकसंख्येकडे औपचारिक तंत्रशिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण असल्याने, नव्या जगाची तंत्रस्नेही असण्याची गरज भागविण्यात ही लोकसंख्या कमी पडत आहे. एका दृष्टीने ही चिंतेची बाब आहेच, शिवाय, रोजगारक्षम वर्गातील कौशल्य आणि क्षमतांची कमतरताही अधोरेखित होते. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी यांमधील ही तफावत दूर होण्याची गरज आहेच, पण भविष्यात ज्या बाबींमुळे असुरक्षिततेचे सावट गडद होऊ शकते, त्या संकटांना सामोरे जाण्याची क्षमता प्राप्त करण्याचे मोठे आव्हान रोजगारक्षम लोकसंख्येस पेलावे लागणार आहे. ओरॅकल नावाच्या एका कंपनीतील कर्मचावर कोसळलेल्या बेरोजगारीच्या संकटातून आणि रोजगारविषयक सर्वेक्षणातून समोर आलेल्या सामान्य बाबींतून भविष्याच्या धोरणांची दिशा ठरवावी लागेल, हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. पंधरा ते 29 या वयोगटातील सुमारे 25 टक्के तरुण रोजगार किंवा शिक्षण यामध्ये कोठेच नाहीत, ही बाबदेखील काळजीची काजळी गडद करणारी आहे. भविष्याचे संकेत स्पष्टपणे मिळत असताना, केवळ रुपेरी रेषेकडे पाहत आनंद मिळविण्यापेक्षा काळ्या ढगांची दखल घेतली नाही, तर ते महागात पडू शकते.