नवी दिल्ली,
LPG पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशाची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कंबर कसली आहे. यासंदर्भात शुक्रवारी राजधानी दिल्लीत एक उच्चस्तरीय आंतर-मंत्रालयीन बैठक झाली. या बैठकीत स्वयंपाकाच्या गॅसवरील (एलपीजी) अवलंबित्व कमी करण्यासाठी युद्धपातळीवर इलेक्ट्रिक इंडक्शन हीटर्स आणि त्यांच्याशी सुसंगत उपकरणांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव, ऊर्जा सचिव आणि विदेशी व्यापार महासंचालक उपस्थित होते. अधिकाèयांच्या मते, जर आखाती देशांमधील युद्ध दीर्घकाळ चालले तर भारताला ऊर्जा संकटाचा सामना करावा लागू शकतो. आयात केलेल्या गॅसचा वापर कमी करण्यासाठी लोकांना गॅस स्टोव्हऐवजी इलेक्ट्रिक इंडक्शन स्टोव्हचा वापर वाढवण्यास प्रोत्साहित करणे, ही सरकारची रणनीती आहे.
पुरवठा साखळी, ऊर्जा संकटाचा धोका
मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ बंद झाली आहे. जगातील 20 टक्के ऊर्जा पुरवठा या मार्गातून जातो. कतारसारख्या देशांमधील एलएनजी सुविधांच्या नुकसानीच्या वृत्तांमुळे चिंता आणखी वाढली आहे. पर्याय शोधण्यासाठी भारताने रशिया, नायजेरिया आणि अंगोलासारख्या देशांकडून तेलाची आयात वाढवली असली तरी घरगुती स्वयंपाकासाठी गॅसची उपलब्धता हे एक मोठे आव्हान आहे.
वाढती मागणी आणि भविष्यातील तयारी
पश्चिम आशियाई संकटाच्या सुरुवातीपासून देशात इंडक्शन हीटर्सच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. तुटवडा टाळण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार आता देशांतर्गत उत्पादकांना प्रोत्साहन देत आहे. याव्यतिरिक्त, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. जेणेकरून खर्चाचा बोजा सर्वसामान्यांवर पडणार नाही.