जनआक्रोशच्या वर्धापन दिनी नितीन गडकरींचे आवाहन
नागपूर,
Janakrosh vardhapan din शहरातील वाहनचालकांना वाहतूकीचे नियमाचे पालन करण्यासाठी जनआक्रोश सातत्याने जनजागृती करीत आहे. भविष्याचे नागरिक घडविण्याची जबाबदारी आपलीच असल्याने आता नागपूर शहर अपघातमुक्त करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व मंत्री नितीन गडकरी यांनी केले. जनआक्रोश फॉर बेटर टुमारो या सामाजिक संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांसोबतच महापौर निता ठाकरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवाणी दाणी, भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, रवींद्र प्रकाश खांडेकर आदी उपस्थित होते.
अपघात स्थळांची माहिती एकत्रित करा
नगरसेवकांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी पुढे म्हणाले, रस्ते सुरक्षिततेबाबत वाहनचालकांना मार्गदर्शन करणे आवश्यक झाले आहे. नगरसेवकांनी आप-आपल्या प्रभागातील अपघात स्थळांची माहिती एकत्रित करुन मनपाच्या संबंधित विभागाकडून अपघात स्थळ परिसरात दुरुस्तीचे काम करावे. जनआक्रोशने अपघातमुक्त वातावरण निर्माण केल्यास नागपूर शहर होण्यास विलंब लागणार नाही.
ब्लॅक स्पॉट्स शोधून काढा
नागपूर शहरातील महत्त्वपूर्ण मुद्दे मांडताना नितीन गडकरी पुढे म्हणाले,
आपल्या प्रभागातील ब्लॅक स्पॉट्स ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना केल्यास अपघाताचे प्रमाण कमी करता येणार आहे. रोडवरील झेब्रा क्रॉसिंग, रेड सिग्नल, लाल, पिवळे दिवे यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. विशेषतः शाळा महाविद्यालयाच्या वाहतूक नियंत्रण, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्वच नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा.
प्रोत्साहन बक्षीस देण्याची योजना
रस्ते अपघात हा अत्यंत गंभीर सामाजिक विषय असल्याने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. रस्ते अपघातग्रस्तांना मदत करणार्यांसाठी केंद्र सरकारकडून २५ हजार रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने अपघातानंतरच्या पहिल्या ७ दिवसांचा उपचार खर्च सरकार उचलत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत
Janakrosh vardhapan din यावेळी रवींद्र कासखेडीकर यांनी ‘जनआक्रोश’ आणि नगरसेवकांची बैठक दर दोन महिन्यांनी महापौरांनी घ्यावी, अशी मागणी केली. कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद रहाटगावकर, संजय डबली, दत्तात्रय कुलकर्णी, भूपेश ज्ञानेश्वर पाहुणे, संजय वझलवार आदींनी परिश्रम घेतले.
रस्ते अपघाताकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले
महाल, झेंडा चौकातील अतिक्रमण, अपघातप्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकरऐवजी ब्लिंकिंग लाईट बसविण्याची मागणी नगरसेवक श्रीकांत आगलावे यांनी केली. तसेच दाभा येथील रस्ते अपघाताकडे नगरसेविका दर्शनी धवड यांनी लक्ष वेधले. विक्रम ग्वालबंशी, योगेश पाचपोर, सुनील हिरणवार, धनश्री आदींनी आपआपल्या प्रभागातील अपघातस्थळांची माहिती दिली. शाळांसमोरील सुरक्षा उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व नगरसेवकांनी आपआपले प्रस्ताव तयार करुन महापौर निता ठाकरे यांच्याकडे द्यावेत. यावर ठोस उपाययोजना केल्या जाईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले. नागपूर शहरातील खासगी बसेसचा त्रास, वायुसेना दाभा रस्त्यावरील अपघात समस्या आदी मुद्दे नगरसेवकांनी मांडले.