वेध
रेवती जोशी अंधारे
Lazy Girl Job Trend फार आधी नाही, अगदी ५-६ वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या कामात खूप फा मेहनत करणे, उशिरापर्यंत काम करणे, फटाफट कामे आटोपून पुढच्या जबाबदाऱ्या घेणे, ही यशाची गुरुकिल्ली मानली जात होती. पण, आता जेन झी युवावर्गाला असे वाटत नाही. लेझी गर्ल जॉब्ज् या लोकप्रिय वर्कप्लेस ट्रेंडनुसार, खूप मेहनत करून यश मिळतंच असं नाही. त्यापेक्षा कामाच्या लवचीक वेळा, कामाचा संतुलित ताण आणि आपलं काम-जीवन यात योग्य ताळमेळ साधणं, जास्त महत्त्वाचं मानलं जातंय. आटोपता येतील एवढ्याच जबाबदाऱ्या आणि कमी ताण घेतल्यासही यश मिळू शकतं, असं हा ट्रेंड शिकवतो.

२६ वर्षांची अन्वी तिच्या कंपनीसाठी वर्क फ्रॉम होम करते. सकाळी ९.३० वाजता ती लॅपटॉपवरून लॉग इन करते. ठरावीक काम, मीटिंग्ज अटेंड करते आणि सायंकाळी ५.३० वाजता लॉग आऊट होऊन लॅपटॉप बंद करून योगावर्गाला निघून जाते. पण, दोन महिन्यांपूर्वी असं नव्हतं. सकाळी ९.०० वाजता लॉग इन करणारी अन्वी रात्री-अपरात्री मेल चेक करायची, केव्हाही होणाऱ्या मीटिंगला धडपडत उपस्थित राहायची. सतत कामाच्या तणावात पिचलेल्या, थकलेल्या अन्वीने विचार केला. तिला घडवायचं असलेलं करीयर हे आहे का? कामाशिवाय आयुष्यात काहीही उरणार नाही, हे यश आहे का? पण, या वैचारिक मंथनातून तिने स्वतःच्या गरजांनुसार नोकरी शोधली. Lazy Girl Job Trend तुलनेने कमी असला तरी निश्चित पगार, कामाचे ठरावीक तास आणि उरलेला स्वतः साठीचा वेळ देणारी ही नोकरी आहे. अशा नोकऱ्यांना सोशल मीडियावर लेझी गर्ल जॉब्ज् म्हणून ओळखतात. हे विचित्र वाटत असलं तरी खरं आहे. तज्ज्ञांच्या मते, या ट्रेंडमधून युवावर्गाचे बदललेले विचार दिसतात. आपले वैयक्तिक जीवन कायम ठेवून, एक चांगले आणि स्थायी करीयर घडविण्याकडे युवकांचा कल आहे.
लेझी गर्ल जॉब्ज् म्हणजे नेमकं काय? तर, कामाचे लवचीक तास, टारगेटचा तणाव नसलेली आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीचे काम न करताही व्यवस्थित पगार देणारी नोकरी! आपल्या महत्त्वाकांक्षांना जरा मुरड घालून, जीवनाचा आनंद घेण्यासाठी केलेली तडजोड म्हणजे लेझी गर्ल जॉब्ज्! याचा अर्थ ही जेन झी मंडळी काम टाळतात, आळशी आहेत, ऐतखाऊ आहेत, असा अजिबात नाही. Lazy Girl Job Trend सतत मेहनत करून, समाजमान्यता असलेलं व्यावहारिक यश मिळविण्याच्या पारंपरिक विचाराला छेद देणाऱ्या या जेन झी विचाराकडे लक्षपूर्वक बघायला हवं. जेन झी मुला-मुलींचं उद्दिष्ट अगदी सोपं आहे. स्मार्टवर्क करून, चांगली कमाई करायची आणि मग आपलं वैयक्तिक आयुष्य आनंदाने जगायचं. यात अगदी फूलशेती करण्यापासून, शास्त्रीय संगीत शिकण्यापर्यंत आणि घरी बाईक दुरुस्तीपासून कुकरी क्लासेस लावण्यापर्यंत कोणत्याही कामाचा आनंद असू शकतो.
हा बदल एका रात्रीतून आलेला नाही. जगभरातील वर्कप्लेसेसवर केलेल्या संशोधनानुसार, जास्त तणाव युवावर्गाच्या कामाला आणि करीयरला प्रभावित करतो. स्टेट ऑफ द ग्लोबल वर्क प्लेसच्या अहवालानुसार, जगभरातील ७६ टक्के कर्मचारी कधी-कधी तणावपूर्ण मानसिक अवस्थेत काम करतात. तर, २८ टक्के कर्मचारी क्वचित किंवा नेहमीच तणावात काम करतात. सतत तणावात राहिल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. एका विशिष्ट वयानंतर, वारंवार आजारी पडणे आणि लहानसहान कारणांनी सुट्या घेण्याच्या प्रमाणात ६३ टक्के वाढ होते. Lazy Girl Job Trend विशेष म्हणजे असे लोक लेझी गर्ल जॉब्ज् शोधू लागतात. या संशोधनानुसार, जगभरातील केवळ ३३ टक्के कर्मचारी स्वतःला यशस्वी मानतात. जेन झी म्हणजे वर्ष १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली पिढी! यांची विशेषता म्हणजे ते पूर्णतः डिजिटल नेटिव्ह म्हणजे स्मार्टफोन्स आणि सोशल मीडियासोबत मोठी झालेली पिढी आहेत. खूप भावनिक नसली तरी विविधता, समानता आणि मानसिक आरोग्यासह सामाजिक बदलांमध्ये बिनदिक्कत पुढाकार घेणारी ही पिढी आहे. आला क्षण आनंदाने जगायला हवा, पुढचा विचार करून कशाला स्वतःला गुंतवायचं? कामाच्या वेळी स्मार्ट काम करायचं आणि वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेताना कामाकडे बघायचंही नाही, हा त्यांच्या जीवनाचा सहज फंडा आहे. वेळोवेळी नॉस्टॅल्जिक होणे, जुनी ॲनालॉग पद्धती समजून घेणे, स्वतःला डिटॉक्स करणे या त्यांच्या प्राथमिकता आहेत. संशोधनानुसार, लेझी गर्ल जॉब्ज् ही संकल्पना करीयरमधील उच्चतम यशाऐवजी स्वतःचं उत्तम आरोग्य आणि आनंदी जीवनाला प्राधान्य देते आहे. सोप्या भाषेत वैयक्तिक आयुष्यासोबत, आनंदी क्षण आणि नात्यांसोबत तडजोड न करता नोकरी करणं, ही यशस्वी करीयरची नवी व्याख्या आहे.
९८५०३३९२४०