महाराष्ट्र केसरी दिग्विजय भोंडवे यांची खास मुलाखत
संतोष तूरक
देवळी,
देवळी येथे या स्पर्धेकरिता दुरवरून पहेलवान आले होते. Maharashtra Wrestling Tournament महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा जिंकणे माझे स्वप्न होते, ते आज पूर्ण झाले आहे. तालमीतील सातत्याने हा पुरस्कार मिळवता आला, अशी माहिती देवळीत दुसरी ग्रीकोरमण महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब स्पर्धा २०२६ चा किताब पटकवणारे भोंडवे यांनी दिली. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक कुस्तीपटूला कोणताही त्रास होणार नाही इतकी सुंदर व्यवस्था या ठिकाणी होती. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी या ठिकाणी जी मल्लांची व्यवस्था केली व इतया सुंदर स्टेडियममध्ये आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दिग्विजय भोंडवे यांनी दुसरी ग्रीकोरमण महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब स्पर्धा २०२६ मध्ये महाराष्ट्र केसरी किताब पटकाविल्यानंतर त्यांनी तरुण भारतच्या प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धेत लढती लढल्या असून आपण राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत तीन सुवर्णपदक तर खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक पटकविले आहेत. सप्टेंबर महिन्यात होणार्या एशियन गेम स्पर्धेची तयारी सुरू असून त्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे ते म्हणाले. तसेच २०२८ मध्ये होणार्या ऑलम्पिक स्पर्धेत देशाकरिता सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न आहे असल्याचे भोंडवे यांनी सांगितले. कुस्तीच्या गुरूंचे नाव विचारले असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे हे माझे वडील असून हेच माझे गुरू आहे. मला वडिलांकडूनच बालपणापासून कुस्तीचे बाळकडू मिळाले असून त्यांच्या तालीमितच शिकलो, घडलो.
Maharashtra Wrestling Tournament या यशाचे रहस्य काय, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, तासनतास सराव, मेहनत, जिद्द, चिकाटी, तालीमीत असलेले सातत्य, मनात बांधलेली गाठ व माझ्या वडिलांचे मार्गदर्शन यामुळे मी हा विजय प्राप्त करू शकलो. आज झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रतिस्पर्धी पहेलवान अक्षय शेळके, बुलढाणा यांच्यासोबत मी या अगोदर सुद्धा कुस्ती खेळलो आहे. ज्या पहेलवानासोबत आपण कुस्ती खेळतो तेव्हा आपल्याला त्याचे डाव हे माहीत असतात. या खेळात शिस्त, संयम, कौशल्य, ताकत, ज्यांनी आत्मसात केले तो पुढे जातो, असेही ते म्हणाले. माझे वडील संदीप आप्पा भोंडवे हे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष असून माझ्या वडिलांची पुणे येथे स्वतःची कुस्तीची तालीम आहे. ते माझ्यासारख्या कित्येक पहेलवानांना तालीम देत असून त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतात. ते स्वतः महाराष्ट्र सुवर्णपदक विजेता आहे व राष्ट्रीय स्तरावर खेळले आहे. मी या यशाचे श्रेय माझे वडील व आईला देतो. भविष्यात माझ्या उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास मी पूर्ण करणार असल्याचे ते तरुण भारत सोबत बोलताना म्हणाले.