‘महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य’ यावर दोन दिवसीय चर्चासत्र

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
गडचिरोली, 
‘Maharastra adivasi sahitya’ भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या साहित्य अकादमी व दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य यावर दोन दिवशीय चर्चासत्राचे आयोजन येथील चामोर्शी रोडवरील व्ही. एस. सेलिब्रेशन हॉल येथे करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी लेखक, संपादक व विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते पार पडले तर बीजभाषक म्हणून मुंबई विद्यापीठ मुंबई येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. विनोद कुंभरे उपस्थित होते. साहित्य अकादमी क्षेत्रीय कार्यालय मुंबईचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नागर यांनी सदर कार्यक्रमाचे उद्देश व्यक्त केले. प्रास्ताविक साहित्य अकादमी सामान्य परिषदेचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे उपस्थित होते.
 
 
adivasi sahitya
 
‘Maharastra adivasi sahitya’  ‘आदिवासी संस्कृती आणि समकालीन आदिवासी साहित्य’ या सत्राच्या अध्यक्षस्थानी वहारू सोनवणे होते. वक्ता म्हणून दशरथ मडावी व गोविंद गायकी यांनी आदिवासी साहित्यावर मार्गदर्शन केले. दुसर्‍या सत्राच्या अध्यक्षस्थानी परभणी येथील साहित्यिक आसाराम लोमटे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून अनिल साबळे, प्रभू राजगडकर यांनी ‘आदिवासी जीवन व प्रस्थापित मराठी साहित्य’ यावर प्रकाश टाकला. ‘आदिवासी लोकसाहित्य संशोधन आणि संपादनाच्या दिशा’ या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी माहेश्‍वरी गावित होते. प्रमुख वक्ता म्हणून श्रीकृष्ण काकडे, काशिनाथ बराटे उपस्थित होते.
 
 
‘Maharastra adivasi sahitya’ चर्चासत्राच्या दुसर्‍या दिवशी पहिल्या सत्रात ‘आदिवासी स्त्री: वास्तव्य आणि साहित्य’ उषाकिरण आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कुसुम आलम यांनी आदिवासी स्त्री यावर मार्गदर्शन केले. ‘मराठी रंगभूमीवरील आदिवासी जीवन आणि संघर्ष’ या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नाट्यलेखक चुडाराम बल्हारपुरे होते. वक्ता म्हणून सुप्रसिद्ध नाट्य कलाकार व सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध बनकर, नाट्य कलाकार प्रा. राज मुसणे यांनी आपले विचार मांडले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले. सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत प्रा.विनायक तुमराम यांनी समारोपीय भाषण केले. याप्रसंगी साहित्य अकादमीच्या दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आलेले होते. संचालन प्रा. हेमराज निखाडे, प्रा. डॉ. विजय रैवतकर, प्रा. डॉ. राम वासेकर यांनी केले. आभारप्रदर्शन यशोधरा उसेंडी यांनी केले.