मुंबई
Malad acid attack case मालाड पूर्व येथील पालनगर परिसरात गुरुवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनधिकृत प्लेटिंग युनिटमध्ये काम करणाऱ्या मजुरांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट ॲसिड हल्ल्यात झाल्याने आठ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यातून रस्त्याने जाणाऱ्या निरपराध पादचाऱ्यांनाही फटका बसला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पालनगर परिसरात अवैधरित्या चालणाऱ्या 100 ते 125 प्लेटिंग युनिट्समध्ये धोकादायक रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. याचपैकी एका युनिटमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांमध्ये सुमारे सहाशे रुपयांच्या उधारीवरून वाद झाला. सुरुवातीला झालेल्या किरकोळ भांडणाने काही वेळातच उग्र स्वरूप धारण केले आणि दोन्ही गटांमध्ये मारामारी सुरू झाली.
वाद विकोपाला गेल्यानंतर Malad acid attack case संतप्त मजुरांनी एकमेकांवर ॲसिड फेकण्यास सुरुवात केली. हा प्रकार रस्त्यालगत घडल्याने त्या वेळी तेथून जाणाऱ्या पादचाऱ्यांवरही ॲसिड उडाले. या घटनेत एकूण आठ जण भाजले गेले असून, संदीप सरोज नावाचा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, इतर सात जखमींवर महानगरपालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही.घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी समर बहादुर राजकुमार सिंह या एका आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध क्रॉस केस दाखल केली आहे. मात्र, या कारवाईवर स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याने जाणाऱ्या काही व्यक्तींनाही आरोपी करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.दरम्यान, पालनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध उद्योग सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या युनिट्समध्ये धोकादायक रसायनांचा बिनधास्त वापर होत असून, यामागे स्थानिक गुंड आणि काही नेत्यांचे संरक्षण असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.