मालदा हिंसाचार प्रकरणात मुख्य सूत्रधारासह ३५ जण अटक

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
मालदा,
Malda violence case पश्चिम बंगालमधील मालदा येथील हिंसाचार प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर निवडणूक आयोगाने एनआयएमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. आयोगाच्या आदेशानंतर एनआयएने तात्काळ तपास सुरु केला असून आतापर्यंत मुख्य सूत्रधारासह ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयए आता संपूर्ण मालदा हिंसाचार प्रकरणाचा तपास करत आहे. बंगाल पोलिसांनी या प्रकरणात आयएसएफ उमेदवार शाहजहान अलीसह ३५ जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना याला बंगाल बदनाम करण्याचा कट असल्याचे म्हटले आहे.
 
 
 
malda
 
उत्तर बंगालचे अतिरिक्त पोलीस महानिदेशक के. जयरामन म्हणाले, मोफक्रुल इस्लाम याला लोकांना भडकवल्याच्या आरोपाखाली बागडोगरा विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. अशा कोणत्याही कारवायांना आम्ही परवानगी देत नाही. या घटनेची पूर्वनियोजनाची चौकशी केली जाईल. आतापर्यंत ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर मोफक्रुल इस्लाम यांनी एनआयएच्या पथकाला सांगितले की, ते आंदोलन आयोजित केलेले नव्हते. त्यांनी सांगितले की, एसआयआरच्या नावाखाली काही मुस्लिम नागरिकांची नावे ‘डी’ मतदार म्हणून नोंदवली किंवा वगळण्यात आली होती आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते तिथे गेले होते. ते कोलकाताहून अलीपूरद्वारकडे जात होते आणि मार्गात भाषण दिले, त्यामुळे त्यांना बागडोगरा विमानतळावर अटक करण्यात आली.
 
मालदा येथील कालियाचकमध्ये सात न्यायिक अधिकाऱ्यांना दंगलखोरांनी सुमारे आठ तास ओलीस ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर, कलकत्ता उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी बंगाल पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आणि घटनास्थळी पोहोचून ओलिसांची सुटका केली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनी या घटनेला हेतुपुरस्सर रचलेला कट म्हटले आणि बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्था नसल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोग इच्छित असल्यास, या प्रकरणाची चौकशी सीबीआय किंवा एनआयएमार्फत करणे शक्य आहे. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एनआयए चौकशीचे आदेश दिले आहेत.