नवी दिल्ली,
paid leave on polling day भारतीय निवडणूक आयोगने चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी जाहीर केली आहे. प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ही महत्त्वाची पायरी उचलण्यात आली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पगारातून मतदानासाठी घेतलेल्या रजेच्या बदल्यात एकही रुपया कपात केला जाणार नाही. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम १३५ब अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी रजा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांपासून ते खाजगी कंपन्यांपर्यंत, तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांनाही या दिवशी पगारी सुट्टी मिळणार आहे. एखादा कर्मचारी आपल्या मतदारसंघाबाहेर नोकरी करत असला तरी त्याला मतदानासाठी रजा घेण्याचा अधिकार राहणार आहे.

या निर्णयाचा लाभ पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी या भागांतील मतदारांना मिळणार आहे. ९ एप्रिल रोजी आसाम, केरळ आणि पुदुचेरी येथे मतदान होणार असून त्या दिवशी संबंधित ठिकाणी सार्वजनिक सुट्टी असेल. त्यानंतर २३ एप्रिल रोजी तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये (पहिला टप्पा) मतदान पार पडणार आहे, तर २९ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान होईल. निवडणूक आयोगाने सर्व नियोक्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. जर कोणत्याही संस्थेने या आदेशाचे पालन केले नाही, तर संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण तापले आहे.