डॉ. संजीव चौधरी यांना रशियन विद्यापीठाचा ‘प्रोफेसर एमेरिट्स’ हा सर्वोच्च बहुमान

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
नागपूर, 
'Professor Emeritus': Dr. Sanjeev Chaudhary सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांना रशियातील पर्म स्टेट विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च ‘प्रोफेसर एमेरिट्स’ हा मानाचा बहुमान जाहीर केला आहे. विद्यापीठाने आपल्या गौरवपत्रात डॉ. चौधरी यांच्या ऑस्टिओपोरोसिस विषयावरील सखोल संशोधनाची विशेष दखल घेतली आहे. ग्रामीण महिलांना या आजाराशी लढा देण्यासाठी सक्षम करणार्‍या डॉ. चौधरी यांच्या या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला जगभरात मिळालेल्या मान्यतेचाही विद्यापीठाने अभिमानाने उल्लेख केला आहे. हा बहुमान म्हणजे त्यांच्या या जागतिक स्तरावरील कार्याचा गौरव असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे.
 
 
Dr. Sanjeev
 
'Professor Emeritus': Dr. Sanjeev Chaudhary  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘चेअर प्रोफेसर’ असताना डॉ. चौधरी यांनी राबविलेल्या ‘ब्लॉसम’ या आदिवासी आरोग्यावरील बहुआयामी शोध प्रकल्पाचीही रशियन विद्यापीठाने नोंद घेतली. आदिवासींच्या आरोग्यावरील आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याची त्यांची ही कामगिरी अत्यंत मोलाची व उल्लेखनीय असल्याचे रशियन विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. गेली २७ वर्षे अहोरात्र रुग्णसेवा, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय मदत व ऑस्टिओपोरोसिसवर जनजागृती या अद्वितीय योगदानाचा सन्मान म्हणून हा बहुमान प्रदान करण्यात येत असल्याचे विद्यापीठाने पत्रात म्हटले आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रशिया येथे चौधरी यांना हा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात येणार आहे.