पुणे,
Pune unseasonal rain अवकाळी पावसाने सलग दोन दिवस पुणे शहराला अक्षरशः झोडपून काढत एप्रिल महिन्यातील पावसाचा तब्बल 130 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये झाडे पडणे, रस्त्यांवर पाणी साचणे, ड्रेनेज तुंबणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवल्या आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले असून नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या अनपेक्षित पावसामुळे शहरातील कचराकुंड्यांमध्ये पाणी साचून कचऱ्याचा चिखल झाला आहे. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाला युद्धपातळीवर काम करावे लागत आहे. पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेत महापालिकेच्या विविध विभागांना तातडीच्या सूचना दिल्या.
कमी कालावधीत झालेल्या या वादळी पावसामुळे शहरातील अनेक भागांत ड्रेनेज तुंबल्याच्या तक्रारी वाढल्या. या तक्रारींची दखल घेत उपमहापौर वाडेकर यांनी उद्यान विभाग तसेच सफाई कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून तातडीने निचऱ्याची कामे सुरू करण्याचे आदेश दिले. नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या संदर्भात बोलताना वाडेकर यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी पाणी साचले, ड्रेनेज तुंबले किंवा घरांमध्ये पाणी शिरले अशा सर्व भागांची नोंद करण्यात आली आहे. आगामी पावसाळा किंवा अवकाळी पावसाच्या काळात नागरिकांना पुन्हा अशा अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी लवकरच प्रभावी उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बोपोडी परिसरातील Pune unseasonal rain पठाण चाळ, हायवे लगतच्या वसाहती तसेच सर्वे क्रमांक 26 परिसरातील तक्रारींची दखल घेण्यात आली असून त्या ठिकाणी स्वच्छतेची कामे करण्यात आली आहेत. मटन मार्केट, दूध भट्टी, मारुती मंदिर परिसर आणि औंध रोड परिसरात साचलेला कचरा काढून स्वच्छता करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पावसाळी लाईन (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) कामांचा आढावा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. “आपले पुणे आपला परिसर” संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत करण्यात आलेल्या कामांचा सविस्तर अहवाल जाहीर करण्याची मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली आणि ती पूर्ण झाली की अर्धवट राहिली, याचा सखोल आढावा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यानंतर प्रशासनही सक्रिय झाले असून सोमवारपासून नालेसफाईची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. पावसाची तीव्रता लक्षात घेता स्थायी समितीची बैठक सुरू असतानाच त्यांनी संबंधित खात्यांच्या प्रमुखांना पाणी साचलेल्या ठिकाणी तातडीने पोहोचून निचऱ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते.
एकूणच, अवकाळी पावसामुळे पुणे शहरातील पायाभूत सुविधांची पुन्हा एकदा कसोटी लागली असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तत्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.