रत्नागिरी,
fire-in-a-running-private-bus : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरात धावत्या खासगी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये सुमारे ३० प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
ही बस पुण्याहून रत्नागिरीकडे येत होती. पहाटेच्या सुमारास साखरपा येथील जाधववाडी परिसरात बस पोहोचताच चालकाच्या लक्षात आग लागल्याचे आले. त्यानंतर त्याने तात्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण बसचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत ठेवली आणि प्रवाशांना मदत केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.