देशातील सर्वात मोठी 'गॅस पाईपलाईन'

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
मुंबई
Samruddhi Expressway gas pipeline आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधन व गॅस टंचाईची समस्या गंभीर होत असताना, महाराष्ट्रासाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाकांक्षी नैसर्गिक गॅस पाईपलाईन प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान सुमारे ६९४ किलोमीटर लांबीची ही पाईपलाईन समृद्धी महामार्गालगत उभारण्यात आली असून, ‘पीएम गती शक्ती’ योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला आहे.
 

Samruddhi Expressway gas pipeline 
गेल इंडिया लिमिटेड (GAIL) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने ही पाईपलाईन उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, देशातील पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर महामार्गासोबत ‘युटिलिटी कॉरिडॉर’चा वापर करून गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. केवळ तीन मीटर रुंदीच्या पट्ट्यातून ही पाईपलाईन टाकण्यात आल्यामुळे जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात टळला असून, प्रकल्पाचा खर्चही कमी झाला आहे. भविष्यातील पायाभूत सुविधांसाठी हा एक आदर्श नमुना मानला जात आहे.
सुमारे २४ इंच व्यासाची ही उच्च क्षमतेची पाईपलाईन दररोज १.६५ कोटी स्टँडर्ड क्युबिक मीटर गॅस वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यामुळे राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या पाईपलाईनमुळे राज्यातील सुमारे ९५ लाख घरांना पाइपद्वारे घरगुती गॅस (PNG) उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच समृद्धी महामार्गालगतच्या जिल्ह्यांमध्ये वाहनांसाठी सीएनजीची सुविधा उपलब्ध होणार असून, अनेक भागांमध्ये प्रथमच सीएनजी पोहोचणार आहे.
औद्योगिक विकासालाही या प्रकल्पामुळे Samruddhi Expressway gas pipeline चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी आणि अन्य औद्योगिक क्षेत्रांना स्वस्त व सुरक्षित गॅस उपलब्ध झाल्यास गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, तसेच रोजगारनिर्मितीला गती मिळेल. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प लाभदायक ठरणार असून, एलपीजी व डिझेलच्या तुलनेत प्रदूषणात घट होण्याची शक्यता आहे.दरम्यान, पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असले तरी सर्वसामान्यांना या गॅसचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी अजून काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, गॅस वितरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, विविध शहरांमध्ये व गावांमध्ये वितरण नेटवर्क तयार करणे, तसेच सुरक्षिततेच्या तपासण्या पूर्ण करणे या प्रक्रिया अद्याप सुरू आहेत. त्यामुळे साधारण चार ते पाच वर्षांनंतरच सर्वसामान्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.या दरम्यान, समृद्धी महामार्गालगतच्या गावांमध्ये या प्रकल्पामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक तरुणांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असून, भविष्यात ही गॅस पाईपलाईन विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘जीवनवाहिनी’ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ऊर्जा, उद्योग आणि वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारा हा प्रकल्प राज्याच्या विकासाला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा आहे.