खकनार परिसरात वाघ मृतावस्थेत आढळला

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
विषप्रयोगाचा संशय, दोन राज्याची संयुक्त चौकशी
 
धारणी, 
Tiger found dead in Khaknar area मध्यप्रदेशातील खकनार रेंजमधील पाचोरी परिसरात गुरुवारी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. ही घटना मध्यप्रदेशासह महाराष्ट्रालगत असलेल्या मेळघाट टायगर रिझर्व परिसराशी संबंधित असल्याने दोन्ही राज्यांच्या वनविभागांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
 
 
tiger
 
माहितीनुसार गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास चुनखडी, नानानगरी गावा लगत दातनपहाडी परिसरात, मध्यप्रदेश—महाराष्ट्र सीमेजवळ वाघाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक तपासणी सुरू केली. मात्र, वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी शुक्रवारी भोपाळहून फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पोस्टमार्टम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वाघ मृतावस्थेत आढळण्याची ही दुसरी घटना आहे.
 
 
Tiger found dead in Khaknar area  सदर परिसर घनदाट जंगलांनी व्यापलेला असून तो मेळघाट टायगर रिझर्वला लागून असल्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांदरम्यान वाघांचे स्थलांतर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मृत वाघ हा नेमका कोणत्या राज्यातील होता, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या एका विशेष माहितीनुसार, वाघाला पाण्याच्या स्रोतामधून विषप्रयोग केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. तथापि, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांच्या वनविभागांकडून संयुक्तपणे सखोल चौकशी सुरू असून, तपास अहवालानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.