94 तासांनी ‘टॉवरमॅन’ श्यामच्या उपोषणाची सांगता

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
प्रशासनाकडून श्यामच्या मागण्यांच्या पूर्ततेचे ठोस आश्वासन
दिग्रस, 
'Towerman' hunger strike तालुक्यातील इसापूर येथील ‘टॉवरमॅन’ म्हणून परिचित असलेले श्याम गायकवाड यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी जीव धोक्यात घालत आंदोलनाचा अनोखा मार्ग अवलंबला होता. रविवार, 29 मार्चच्या रात्री 10 च्या दरम्यान दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बीएसएनएल कार्यालयाचा सुनसान परिसर पाहून उंच टॉवरवर चढून उपोषण सुरू केले होते. ही घटना सोमवार, 30 मार्चला सकाळी उघडकीस आली.
 
 
gakyakwad
 
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. प्रशासनाने श्याम गायकवाडच्या मागण्यांच्या पूर्ततेचे ठोस आश्वासन देताच चौथ्या दिवशी तब्बल 94 तासांनी टॉवरमॅन श्याम गायकवाडने आपले आंदोलन मागे घेऊन उपोषणाची सांगता केली आणि प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. श्याम गायकवाड याने यापूर्वी आपल्या सहा मागण्यांबाबत मुख्यमंत्री, मानवी हक्क आयोग, पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच स्थानिक पोलिसांना निवेदने सादर करून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
श्याम गायकवाड यांची या पूर्वीच्या टॉवरवरील वीरूगिरी आंदोलनाची पद्धत पाहून त्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेणे गरचेचे होते. मात्र त्यावर कोणतीही ठोस अंमलबजावणी न झाल्याने अखेर टॉवरवर चढून उपोषण करण्याचा मार्ग त्यांना स्वीकारावा लागला.
 
 
 
'Towerman' hunger strike  अखेर चौथ्या दिवशी प्रशासन श्याम गायकवाडची मनधरणी करण्यात यशस्वी झाले. प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतर श्याम गायकवाडने चौथ्या दिवशी तब्बल 94 तासांनी प्रशासनावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेतले. श्याम गायकवाडांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत : इसापूर ग्रामपंचायतमध्ये प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण न करणाèया सचिवावर कारवाई, नमुना 8 नोंद असलेले रजिस्टर चोरी प्रकरणाची चौकशी, गावाचा अधिकृत नकाशा उपलब्ध करून देणे, मालमत्ता क्रमांक 553 संदर्भातील नोंदींची तपासणी, गावाच्या जनगणनेची माहिती आणि शासनाच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाèयांनी इसापूरला भेट द्यावी.
 
 
 
या सर्व मागण्या गटविकास अधिकारी रमेश खरोडे यांनी तहसीलदार मयूर राऊत यांच्या समक्ष मान्य केल्याने उपोषणकर्ते श्याम गायकवाड यांनी टॉवरवरून खाली उतरून मागील चार दिवस टॉवरजवळ बंदोबस्तास असलेल्या पोलिसाच्या हस्ते सरबत घेऊन 94 तासांनी उपोषणाची सांगता केली. उपोषण सोडल्यानंतर श्याम गायकवाड यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना हात जोडून नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याची विनंती करत नागरिकांवर उपोषणाची पाळी येऊ देऊ नये, अशी विनंती केली.
आधीच माहिती का दिली नाही ?
आंदोलनकर्ते श्याम गायकवाड यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे प्रसाशनाने मान्य केले म्हणजे त्यांच्या मागण्या रास्त होत्या. मग त्यांनी एक महिन्यापूर्वीच निवेदन देऊन माहिती मागितली होती ती का देण्यात आली नाही ? तब्बल चार दिवस, 94 तास त्यांना जीव धोक्यात टाकून आंदोलन का करावे लागले, याबाबत आता नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
जीव धोक्यात टाकून आंदोलन
'Towerman' hunger strike  प्रत्येक नागरिकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी जीव धोक्यात टाकून आंदोलन करू नये. यापुढे जीव धोक्यात घालून अशा प्रकारचे आंदोलन केल्यास गुन्हे दाखल होतील. त्याचप्रमाणे संबंधित विभागानेही नागरिकांच्या समस्या सामंजस्याने सोडवाव्यात, असे आवाहनही याप्रसंगी तहसीलदार मयूर राऊत यांनी नागरिकांना केले.