वणी,
Wani: Sports Complex वणी नगर परिषद क्षेत्रात अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी जिल्हा खनिज निधी अंतर्गत तब्बल 6 कोटी 90 लाख 98 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वणी शहरातील क्रीडा क्षेत्राला नवे बळ मिळणार असून युवकांसाठी विविध आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहेत. सदर क्रीडा संकुल नगर परिषद शाळा क्रमांक 7 च्या परिसरात उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्वतः स्थळाची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. नगर परिषद प्रशासनाने क्रीडा प्रेमी व युवकांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचा मानस ठेवला आहे. प्रस्तावित स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये क्रिकेट, योगा, हँडबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस, खो-खो, फुटबॉल आदी खेळांसाठी स्वतंत्र मैदाने उभारण्यात येणार असून पार्किंग व विद्युतीकरणाचीही सोय केली जाणार आहे. तसेच वॉकिंग ट्रॅक, कॅन्टीन, गार्डन, क्रॉसफिट जिम, ग्रीन जिम आणि एथलेटिक्ससाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
Wani: Sports Complex याशिवाय खेळाडूंना प्रशिक्षणासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वणी परिसरातील युवकांना आपले क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे. या मैदानासाठी संरक्षक भिंत माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकारातून पूर्ण करण्यात आली असून त्यामुळे मैदानासह परिसरातील मराठी शाळेला संरक्षण मिळाले आहे. क्रीडा संकुलासाठी मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे यांनी प्रस्ताव तयार करून सादर केला होता. या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून 6.90 कोटी निधीपैकी 20 टक्के रक्कमही नगर परिषदेला प्राप्त झाली आहे. या प्रकल्पामुळे वणीतील क्रीडा क्षेत्रात लक्षणीय प्रगती होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नगर परिषद व जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून तसेच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नांमुळे वणी शहरात क्रीडा क्षेत्रात नवी क्रांती घडेल, अशी माहिती नप अध्यक्ष विद्या खेमराज आत्राम आणि उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार व नियोजन समितीचे सभापती लक्ष्मण उरकुडे यांनी दिली.