Wardha Market Committee हवामान विभागाने ३० आणि ३१ मार्च रोजी अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. ३० रोजी रात्री ९.३० च्या दरम्यान जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला. एक दिवसाची विश्रांती घेत बुधवार १ रोजी वादळ वार्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. अनेक घरांचे छत उडाले, काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली. अशातच येथील कृषी उत्पन्न बाजारातील ६०० विंटल चणा आणि गहू पावसात भिजल्याने व्यापार्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Wardha Market Committee जिल्ह्यात रबी हंगाम आता संपत आला आहे. गहू आणि चण्याची कापणी जवळपास पूर्ण झाली आहे. बाजार समितीकडे मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभरा येत असून, व्यापारी खरेदी करण्यात व्यस्त आहेत. हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. सोमवारी वर्धा बाजार समितीत ३६२ विंटल चणा आणि १ हजार ६६९ विंटल गहू खरेदी करण्यात आला. खरेदी केलेला माल पोत्यांमध्ये भरून बाजार समितीच्या आवारात ठेवण्यात आला होता. हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजामुळे व्यापार्यांनी खरेदी केलेला माल ताडपत्रींनी झाकून ठेवला होता. अचानक रात्री पाऊस सुरू झाला पावसामुळे गोण्यांच्या वरच्या भागाचे नुकसान झाले नसले तरी गोण्यांच्या खालच्या भागात पाण्याचे लोट गेल्याने जवळपास ६०० विंटल चणा आणि गहू भिजला. ताडपत्रीवरून पडलेले पाणीही पोत्यांवरून खाली वाहून गेल्याने धान्याचे आणखी नुकसान झाले. यात व्यापार्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.