वीज कार्यालयासमोर लावले बेशरमचे झाड

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
दर्यापूर,
daryapur electricity office शहरात सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार होणार्‍या खंडित वीज पुरवठ्यामुळे विशेषत: उष्णतेच्या दिवसांत लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पृष्ठभूमीवर दर्यापूर नगरपालिकेतील नगरसेवकांनी थेट विद्युत वितरण कार्यालयावर धडक देत अधिकार्‍यांना जाब विचारला, तसेच महिला नगरसेवकांनी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निषेध म्हणून बेशरमचे झाड लावून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित विभाग नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नसून संपर्क साधण्यासही अडचणी येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
 

वीज कार्यालय 
 
 
या वेळी नेहा शिवाजी देशमुख, वंदना विठ्ठलसिंग सोलंकी, कविता दिलीप गवई, मंदा दादाराव इंगळे, वर्षा विनोद बोरेकर, मुनिफा बेग यांच्यासह इतर नगरसेविका-नगरसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांनी मिळून अधिकार्‍यांना निवेदन सादर करत तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे. यापूर्वी सुद्धा विठ्ठलसिंह सोलंकी यांनी विद्युत वितरण कार्यालयात अनेक वेळा तक्रारी नोंदवल्या तसेच वृत्तपत्रांमध्ये वृत्त सुद्धा प्रकाशित केले होते, तरी कुठलेही नियोजन झाले नाही.
सध्या उन्हाचा तीव्र तडाखा वाढलेला असून गर्मीमुळे अचानक ब्रेकडाऊन होते. पुढील दोन ते तीन आठवडे ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.daryapur electricity office या पृष्ठभूमीवर नागरिकांनी महावितरणला सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या घरातील किंवा व्यावसायिक ठिकाणांमधील कचरा डीपीजवळ किंवा विद्युत तारांच्या खाली जाळणे टाळावे. महावितरणचे कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी जबाबदारीने वागून सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक अभियंता सारंग गजभिये यांनी केले आहे.