गडचिरोली,
dc avisyanth panda गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर, छत्तीसगड सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल 77 वर्षांत प्रथमच जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकार्यांनी प्रत्यक्ष भेट देत नागरिकांशी मुक्त संवाद साधला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या संवेदनशील भागात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांच्या अडचणींची थेट पाहणी केली आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
दौर्यादरम्यान जिल्हाधिकार्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना वैयक्तिक व सामूहिक वनपट्टयांबाबत माहिती घेतली. वनपट्टेधारकांनी तातडीने फार्मर आयडी तयार करून घ्यावा, कारण याच ओळखपत्राच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी पक्का रस्ता, मोबाईल टॉवर, नियमित वीजपुरवठा, नवीन वनपट्टे अशा मूलभूत मागण्या मांडल्या. त्यावर जिल्हाधिकार्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
संवादादरम्यान नागरिकांनी दाखले काढण्यासाठी भामरागडला जावे लागते, वीजपुरवठा खंडित होतो, दुरुस्ती वेळेवर होत नाही, अशा अडचणी मांडल्या. त्यावर जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांना बोलावून वीज व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश देणार असल्याचे सांगितले. राशन वितरण नियमित असल्याची माहिती नागरिकांनी दिली. तसेच मलेरियापासून बचावासाठी दिलेल्या मच्छरदाण्यांचा वापर होत असल्याचेही सांगितले.
लाहेरी येथे ग्रामपंचायत भवनात नागरिकांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. यावेळी जिल्हाधिकार्यांच्या हस्ते वनपट्टेधारकांना फार्मर आयडीचे वितरण करण्यात आले.dc avisyanth panda ग्रामस्थांनी आरोग्य, शिक्षण, ई-पीक पाहणी, धान खरेदीचे प्रलंबित चुकारे, नेटवर्क समस्या, गोदाम अभाव अशा विविध मुद्द्यांवर अडचणी मांडल्या.
जिल्हाधिकार्यांनी यावर वनपट्टेधारकांना ई-पीक पाहणीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, बीएसएनएल नेटवर्क सुधारण्यासाठी पाठपुरावा व 4 जी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न, गुंडेनूर नाल्यावर पूल व राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने पूर्ण करणे, लाहेरीत धान साठवणुकीसाठी गोदाम बांधकाम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.