पोलिस दलाच्या प्रयत्नांनी तुमरकोठी गावात विद्युत सेवा सुरू

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
गडचिरोली,
electricity service गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहूल व माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्र व्हावे यासाठी गडचिरोली पोलिस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आदिवासी नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाच्या प्रयत्नांनी हेडरी उपविभागातील अतिदुर्गम तुमरकोठी येथे 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सहकार्याने सुरळीतपणे विद्युत सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होणार आहे.
 

electricity service 
 
 
तुमरकोठी येथे गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने 19 डिसेंबर 2025 रोजी नवीन पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आली होती. सदर पोलिस स्टेशन स्थापनेमुळे दीर्घकाळापासून मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या तुमरकोठी गावात विकासाला चालना मिळाली आहे. या विकासाला गतीमान करण्यासाठी दुर्गम भौगोलिक परिस्थिती, वाहतुकीची कमतरता आणि सुरक्षा संदर्भातील अडचणी असूनही पोलिस दलाने संबंधित विभागांशी समन्वय साधून तुमरकोठी गावामध्ये विद्युत पुरवठा सुरु केलेला आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे गावातील नागरिकांना आता प्रकाश, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना पोलिस दलाच्या वतीने 100 बल्ब, 100 होल्डर, वायर व आवश्यक साहित्य मोफत पुरविण्यात आले.electricity service त्यामुळे नागरिकांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होणार, अशी आशा पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी व्यक्त केली आहे.
सदर उपक्रम पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी.,पोलिस उप-अधीक्षक विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीएफ 191 बटालियन एफ कंपनीचे पोलिस निरीक्षक होनप्पा, प्रभारी पोलिस अधिकारी गोरखनाथ सुरासे, कनिष्ठ अभियंता रोशन मानकर व तुमरकोठीचे इतर अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रयत्नांनी पार पडला.