नवी दिल्ली,
Five dead in running car fire दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. धावत्या कारला अचानक आग लागल्याने पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात लक्ष्मणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून कोटाकडे निघालेल्या कारला मौजपूरजवळ पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणामुळे आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण वाहनाला वेढा घातला. गाडीत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी न मिळाल्याने ते आतच अडकून राहिले आणि काही मिनिटांतच वाहन जळून खाक झाले.

या दुर्घटनेत मध्य प्रदेशातील श्योपूर येथील तीन महिला, एक लहान मूल आणि एका पुरुषाचा जिवंत जळून मृत्यू झाला. हा अपघात द्रुतगती मार्गावरील खांब क्रमांक ११५/३०० जवळ घडल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, चालक विनोद कुमार मेहेर यांनी प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला, मात्र ते गंभीररीत्या भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्ती पथक आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलालाही कळविण्यात आले.
अग्निशमन दल पोहोचेपर्यंत वाहन पूर्णतः जळून गेले होते. त्यानंतर दोन अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी अलवर येथे हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. अपघाताचे नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.