कारंजा (घा.),
mla wankhede ग्रामगीतेच्या आचरणातून गावातील एकता, ग्राम संस्कृती, युवाशती जागृत होऊन केवळ गावाचाच नव्हे तर देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, एवढे सामर्थ्य तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेत आहे, असे प्रतिपादन आ. सुमित वानखेडे यांनी केले. तालुक्यातील मदनी येथील युवकांनी प्रदीप शेटे यांच्या पुढाकारात आयोजित केलेल्या ग्रामजयंती उत्सवात ते बोलत होते. २६ एप्रिल ते ३ मेपर्यंत हा ग्रामजयंती उत्सव साजरा होत आहे. सातही दिवस भागवतकार निर्मला बाळापुरे भागवत या कथेचे वाचन करीत आहेत.
निर्मला बाळापुरे अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुमित वानखेडे, ठाणेदार प्रल्हाद मदन, प्रा. अरुण फाळके यांची यावेळी उपस्थिती होती. आमदार सुमित वानखेडे यांनी ग्रामगीतेचे महत्व विषद केले. ग्रामगीता हा अमृततुल्य ग्रंथ वाचनासाठी नसून आचरणाकरिता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तालुक्यातील शेतकर्यांची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी कार प्रकल्पाची उंची वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. जोडनदी प्रकल्पातून पाणी घेणे, गोसीखुर्द धरणातून पाईपद्वारे पाणी आणून साठवून लिफ्ट सिंचन पद्धतीचा वापर करून सिंचन समस्या पुढील काही वर्षात सोडविण्याचा प्रयत्न शासन दरबारी सुरू असल्याचे आ. वानखेडे यांनी सांगितले. कारंजा एमआयडीसीमध्ये रिकामे असलेले भूखंड गरजू युवा उद्योजकांना देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रा. अरुण फाळके यांचेही भाषण झाले. ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी घर सोडून निघून जाणार्या तरुण मुलींची ’कथा आणि व्यथा’ या विषयावर मार्गदर्शन केले. हभप निर्मला बाळापुरे यांनी गावाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याचा मार्ग सांगितला.
प्रदीप शेटे यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. स्मिता भुयार तर आभार पोलिस पाटील शेटे यांनी मानले. यावेळी सामाजिक काम करणार्या पाच युवकांचा सत्कार करण्यात आला.