गुरुकुंजात ग्रामजयंती महोत्सवाची सांगता

शेतकरी ग्रामनाथांचा सन्मान

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
तिवसा,
gram jayanti राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुरुकुंज नगरीत साजरा करण्यात आलेल्या ग्रामजयंती महोत्सवाची आज अत्यंत भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. त्यांच्या कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज येथील महासमाधी परिसरात पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सामुदायिक ध्यानाने दिवसाची सुरुवात झाली. हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा हृदयस्पर्शी वातावरणात पार पडला.
 

gramjayanti 
 
 
ग्रामजयंतीच्या शुभ पर्वावर गावकर्‍यांनी पहाटेच ग्रामस्वच्छता अभियान राबवत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. महासमाधी परिसर लक्षावधी दिव्यांनी उजळून निघाला होता, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी झाले होते.
पहाटे पाच वाजता सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर तुकडोजी महाराजांच्या भजनांचा एक तास रंगला. त्यांच्या जन्मकाळातील परिस्थितीचे विवेचन करण्यात आले. सामुदायिक ध्यानानंतर महाआरती पार पडली. सीमा इंगळे यांनी चिंतन व्यक्त करत ग्रामगीतेच्या विचारांचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. गेल्या दीड महिन्यापासून गुरुदेव महिला मंडळाच्या वतीने महासमाधी स्थळी ग्रामगीता पठणाचा दैनंदिन उपक्रम राबविण्यात आला होता.
 
तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत गोपालकाला व महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी पंडित शंकरराव वैरागकर यांच्या सुमधुर वाणीतून संगीत संध्या सादर करण्यात आली. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 
शेतकर्‍यांचा सन्मान हीच खरी ग्रामजयंती
महोत्सवात शेतात राबणार्‍या कष्टकरी शेतकर्‍यांचा विशेष सन्मान करण्यात आला. लक्ष्मीकांत पाचघरे (गुरुदेव नगर), रामजी सावंत (धोत्रा), श्रीकृष्ण उमप (मोझरी) यांच्यासह पाच ग्रामनाथ शेतकर्‍यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, पद्मश्री जनार्दन बोथे, गुलाब खवसे, गोपाल कडू, अविनाश ठाकरे, दीपक वासनिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
शोभायात्रा व कीर्तनाने उत्साह शिगेला
 महोत्सवाच्या निमित्ताने गुरुकुंजातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हभप विलास महाराज साबळे यांच्या कीर्तनाने वातावरण भक्तिरसात रंगून गेले. गोपालकाला व महाप्रसाद कार्यक्रमामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण दळवी, उद्धव वानखडे, नंदकिशोर डीक्कर, सुहास टप्पे, अनिल चिखलकर, सागर रावणकर तसेच महिला मंडळ व भाविकांनी विशेष परिश्रम घेतले.