‘जय जय महाराष्ट्र माझा’ असे झाले घोषित

-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मिळाला अधिकृत स्वर -सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर,
jai jai maharashtra maja महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात 1 फेब्रुवारी 2023 हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाद्वारे कविवर्य राजा नीळकंठ बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत म्हणून मान्यता देण्यात आली. 19 फेब्रुवारी 2023 पासून या निर्णयाची अधिकृत अंमलबजावणी झाली आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला अधिकृत स्वर लाभला.
 
 
jai jai maharashtra maja
 
 
महाराष्ट्रात राज्यगीत निवडीची प्रक्रिया सुरू झाली. या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शासनाने विशेष समिती गठीत केली. विविध गीतांचा अभ्यास करून समितीसमोर अनेक पर्याय ठेवण्यात आले. त्यामध्ये तीन गीतांचा विचार झाला. सर्वप्रथम विचार झाला तो ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा. दुसरे गीत होते, ‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ आणि तिसरे गीत होते, ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’.
काही स्तरांवर ‘मंगल देशा पवित्र देशा’ या गीताचाही विचार झाला.jai jai maharashtra maja मात्र लोकमान्यता, ऐतिहासिक स्वीकार, सर्वदूर लोकप्रियता, सादरीकरणाची सुलभता आणि महाराष्ट्राच्या सर्व भागांशी असलेले भावनिक नाते या निकषांवर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत सर्वार्थाने उजवे ठरले.
शासन निर्णयानुसार, या गीताची 1 मिनिट 41 सेकंदांची प्रमाणित आवृत्ती निश्‍चित करण्यात आली. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हे गीत सादर करताना उपस्थितांनी सावधान स्थितीत उभे राहून सन्मान व्यक्त करणे बंधनकारक करण्यात आले. आज हे गीत केवळ शासकीय औपचारिकता राहिलेले नाही; ते महाराष्ट्राच्या सामूहिक भावविश्‍वाचा अविभाज्य भाग बनले आहे.