दिल्ली वार्तापत्र
operation broom राघव चड्ढा यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षामधील (आप) सात राज्यसभा सदस्यांचा एक गट मागील आठवड्यात भाजपात विलीन झाला. या घटनेमुळे आप तसेच आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात असताना भाजपाने दिल्लीत ऑपरेशन झाडू घडवून आणले. विशेष म्हणजे या ऑपरेशन झाडूची कुणकुणही भाजपाने कोणाला लागू दिली नाही. सर्व जण पूर्णपणे बेसावध असताना भाजपाने गनिमी काव्याने ते घडवून आणत आपले राजकीय कौशल्य दाखवून दिले आहे. उत्पादन शुल्क घोटाळ्यात केजरीवाल दिल्ली उच्च न्यायालयात आपली बाजू स्वत:च मांडत असताना म्हणजे स्वत:चीच वकिली करत असताना आपच्या या सदस्यांनी त्यांना गुंगारा दिला आणि पक्षाला रामराम ठोकला. त्यातील सहा राज्यसभा सदस्य पंजाबमधील तर एक दिल्लीतील आहे. त्यामुळे या घटनेचा राजकीय परिणाम दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांतील आपच्या अंतर्गंत राजकीय घटनाक्रमावर होणार आहे. राघव चड्ढा, स्वाती मालिवाल, संदीप पाठक, हरभजनसिंग, अशोक मित्तल, राजेंद्र गुप्ता आणि विक्रम सहानी हे आपचे सात राज्यसभा सदस्य पक्षातून बाहेर पडले.
आपमध्ये आता संजयसिंह, एन. डी. गुप्ता आणि बलबीरसिंह सिचेवाल असे इनमीन तीन सदस्य उरले आहेत. स्वाती मालिवाल आणि राघव चड्ढा हे आपवर नाराज असल्याची माहिती होती. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी आप सोडतील, हे नक्की होते, पण खासदारकी टिकवण्यासाठी या दोघांनी पक्ष सोडणे पुरेसे नव्हते. त्यामुळे आवश्यक संख्याबळ गोळा करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यात आपचे आणखी पाच खासदार भाजपाच्या गळाला लागले. काही दिवसांपूर्वींच आपने राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरुन हटवून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केली होती. गंमत म्हणजे चड्ढा यांच्यासोबत मित्तल यांनीही आपला रामराम ठोकला. त्यामुळे आपची स्थिती गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले, अशी झाली आहे. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर केजरीवाल दिल्लीत बेघर झाले होते. त्यांच्याजवळ राहायला घरही नव्हते. त्यामुळे दिल्लीत वणवण फिरत ‘कुणी घर देता का घर’ अशी याचना ते करत होते. अशोक मित्तल यांनी त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून मिळालेला बंगला केजरीवाल यांना राहायला दिला होता. केजरीवाल यांचे आतापर्यंतचे वास्तव्य याच बंगल्यात होते. तर अशा या मित्तल यांनी आप सोडत केजरीवाल यांना चांगलाच ‘घरचा अहेर’ केला असे म्हटले तर ते चूक ठरू नये. स्वाती मालिवाल तर बèयाच महिन्यांपासून आपपासून दूर झाल्या होत्या. केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभवकुमार यांनी स्वाती मालिवाल यांना केजरीवाल यांच्या उपस्थितीत बदडून काढले होते, त्यांच्या अंगावर हात घातला होता. ही घटना तेव्हा खूप गाजली होती. कधी काळी केजरीवाल यांचे लाडके असलेले राघव चड्ढाही आपपासून फटकून राहत होते. पक्षांतर बंदी कायद्यानुसार किमान दोन तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केले तर सदस्यत्व रद्द होत नाही. राज्यसभेत आपचे दहा सदस्य होते. यातील दोन तृतीयांश म्हणजे सात सदस्य भाजपात आल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यातून या सर्वांची सुटका झाली. राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन् यांनी आप सदस्यांच्या या गटाच्या भाजपातील विलीनीकरणावर शिक्कामोर्तब केल्यामुळे हा विषय आता कायमस्वरूपी निकालात निघाला आहे. आपने या सात सदस्यांना पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरवण्याची विनंती राधाकृष्णन् यांना केली होती, पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असल्यामुळे त्यांनी ती फेटाळून लावली. त्यामुळे आपसमोर हात चोळत बसण्याशिवाय काही पर्यांय उरला नाही. माझ्यासारखा हुशार दुसरा कोणी नाही, असा स्वत:बद्दलचा गैरसमज केजरीवाल यांनी करून घेतला होता. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आपल्या मास्टर स्ट्रोकने त्यांचे गर्वाचे घर खाली उतरवले आणि एकाच दगडात अनेक पक्षीही मारले. आपचे लोकसभेत फक्त तीन खासदार आहेत, हे सर्व पंजाबमधून निवडून आले आहेत. राज्यसभेपाठोपाठ आपच्या लोकसभेतील सदस्यांनीही केजरीवाल यांना नजीकच्या काळात रामराम केला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भाजपा नेत्यांच्या मनात येईल, त्या दिवशी लोकसभेतून आपचे नामोनिशाण मिटू शकते. लोकसभेत दोन तृतीयांश म्हणजे आपच्या तीनपैकी दोन खासदारांनीच पक्ष सोडण्याची गरज आहे. जे भाजपच्या नेत्यांसाठी दोन मिनिटांचेही काम नाही. ऑपरेशन झाडूचा सर्वाधिक परिणाम पंजाबवर होणार आहे. सध्या देशातील एकमेव राज्यात म्हणजे पंजाबमध्ये आपचे सरकार आहे. राज्यसभेच्या सात खासदारांनी आप सोडल्यामुळे पंजाबमधील मान सरकार अस्थिर होण्याची शक्यता बळावली आहे. केजरीवाल आणि मान यांच्यासमोर पंजाबमधील आपले आमदार एकत्रित ठेवण्याचे, त्यातील कोणी फुटणार नाही, याची काळजी घेण्याचे आव्हान उभे झाले आहे.operation broom दिल्लीतही आपचे 22 आमदार आहेत. दिल्ली आपमधील आमदारांचा मोठा गटही आप सोडून भाजपात आला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यामुळेच आपच्या सदस्यांनी विश्वासघात केल्याची प्रतिक्रिया केजरीवाल यांनी, तर पक्ष सोडणारे आपचे खासदार गद्दार असल्याची प्रतिक्रिया पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी पंजाब आणि गुजरात विधानसभेची निवडणूक आहे. पंजाबमध्ये दुसèयांदा आप सत्तेवर येण्याची शक्यता या ताज्या घटनाक्रमामुळे मावळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. गोवा आणि गुजरातवर आपने आपले लक्ष केंद्रित केले होते. भाजपासमोर आव्हान निर्माण केले होते. पण आता या दोन राज्यांत आप आपल्या पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकत नाही. आपने आपला आत्मविश्वास पूर्णपणे गमावला आहे. आपच्या नेत्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचले आहे. 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आपमधील कर्तेधर्ते संदीप पाठक होते. आपचे उमेदवार निश्चित करण्यापासून प्रचारापर्यंतची सर्व व्यूहरचना पाठक यांनी आखली होती आणि यशस्वी करून दाखवली होती. राघव चड्ढा हे तेव्हा आपच्या प्रचाराचा केजरीवालांखालोखालचा मुख्य चेहरा होते. त्यामुळे पंजाबमध्ये आपला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी राघव चड्ढा यांच्या नावाचीही चर्चा झाली होती. पंजाबमधील आपचे सर्व आमदार संदीप पाठक यांच्या संपर्कात पहिलेपासून आहे. यावरून पंजाबमधील भगवंत मान यांचे सरकार कसे डायलिसिसवर आहे, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. यामुळेच दुखावलेल्या मान सरकारने पक्ष सोडलेल्या आपच्या सहाही खासदारांची सुरक्षा काढून घेत त्यांना वाèयावर सोडले. हरभजनसिंगच्या निवासस्थानासमोर निदर्शने करणाèया आपच्या कार्यकर्त्यार्ंना पोलिसांनी रोखण्याचाही प्रयत्न केला नव्हता. या खासदारांच्या जिवाला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे या सर्व खासदारांना केंद्र सरकारला सीआरपीएफची वाय दर्जाची सुरक्षा उपलब्ध करून द्यावी लागली. आपचे सात राज्यसभा सदस्य भाजपात आल्यामुळे राज्यसभेतील भाजपाच्या सदस्यांची संख्या 113 झाली आहे. तर राज्यसभेतील रालोआच्या सदस्यांची संख्या 148 वर गेली आहे. यामुळे 245 सदस्यांच्या राज्यसभेत भाजपाचे नसले तरी रालोआचे स्पष्ट बहुमत झाले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य नितीन नवीन यांनीही राज्यसभा सदस्यत्वाची नुकतीच शपथ घेतली. बिहारमध्ये भाजपाच्या मुख्यमंत्र्याने शपथ घेतली, तर राज्यसभेत भाजपाचे संख्याबळ वाढले, हा बिहारच्या असलेल्या नितीन नवीन यांचा पायगुण म्हणायला हरकत नाही. श्यामकांत जहागीरदार 9881717817