मुंबई
Bacchu Kadu राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून शिंदे गटाकडून अपक्ष आमदार बच्चू कडू यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर, पक्षात प्रवेशाच्या अटीवर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान धनुष्यबाण चिन्ह स्वीकारण्याची अट असल्याचे सांगितले जात होते. या सर्व घडामोडींवर अखेर स्वतः बच्चू कडू यांनी भूमिका स्पष्ट करत मोठी घोषणा केली आहे.दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. “दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेत आहे,” असे ते म्हणाले. त्याचवेळी प्रहार संघटना कायम राहणार असून तिच्या माध्यमातून सामाजिक लढा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेची राजकीय Bacchu Kadu ताकद वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून त्याचबरोबर शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी पूर्ण ताकदीने संघर्ष सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.दरम्यान, या निर्णयामुळे बच्चू कडू यांच्या राजकीय प्रवासात महत्त्वाचा बदल घडत असल्याचे मानले जात आहे. शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अधिक बळावली असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा एकदा बदल होण्याची चिन्हे दिसू लागली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय डाव मानला जात आहे.