मुंबई,
Mumbai Indians in trouble बुधवारी झालेल्या थरारक सामन्यानंतर मुंबई इंडियन्ससमोर प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान अधिकच कठीण झाले आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने तब्बल २४३ धावांचा डोंगर उभारला, परंतु गोलंदाजांच्या अपयशामुळे ही भक्कम धावसंख्या सुद्धा वाचवता आली नाही आणि सनरायझर्स हैदराबादने शानदार पाठलाग करत विजय मिळवला.या सामन्यात रायन रिकेल्टनने १२३ धावांची झंझावाती खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ही खेळी आयपीएलमधील मुंबईच्या फलंदाजाची आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. मात्र, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांसारखे अनुभवी गोलंदाज असतानाही संघाला प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात अपयश आले.
लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पहिल्या विकेटसाठी जलद धावसंख्या उभारली. काही वेळा मुंबई पुनरागमन करेल असे वाटत असतानाच हेनरिक क्लासेन आणि सलील अरोरा यांच्या दमदार फलंदाजीने हैदराबादला सामना जिंकून दिला.या विजयामुळे हैदराबाद संघ गुणतालिकेत वर सरकून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्या खात्यात आता बारा गुण जमा झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि राजस्थान रॉयल्स यांच्याही बारा गुणांमुळे स्पर्धा अधिक चुरशीची झाली असून, धावगतीच्या आधारे स्थान निश्चित होत आहे. पंजाब किंग्स सध्या आघाडीवर आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सची स्थिती चिंताजनक बनली आहे. आठ सामन्यांपैकी फक्त दोन विजय मिळवणाऱ्या मुंबईच्या खात्यात केवळ चार गुण आहेत आणि संघ तळाच्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, आपल्या घरच्या मैदानावर सलग पराभव पत्करण्याची वेळही यंदा प्रथमच आली आहे. मुंबईसमोर आता उरलेल्या सहा सामन्यांमध्ये प्रत्येक सामना जिंकणे अत्यावश्यक झाले आहे. सर्व सामने जिंकल्यास ते सोळा गुणांपर्यंत पोहोचू शकतात आणि प्लेऑफची आशा जिवंत राहू शकते. मात्र, एक जरी सामना गमावल्यास त्यांचा पुढील प्रवास जवळपास अशक्य होईल. त्यामुळे आगामी सामने मुंबईसाठी ‘करो किंवा मरो’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.