मुंबई,
New guests at Sambhavna Seth's house लग्नाला दशक पूर्ण झाल्यानंतर अखेर मातृत्वाचा आनंद मिळणार असल्याची आनंदवार्ता अभिनेत्री संभावना सेठ यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी ती सरोगसीच्या माध्यमातून आई होणार असून, हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. संभावना सेठ आणि त्यांचे पती अविनाश द्विवेदी यांना लग्नानंतर अनेक वर्षे अपत्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. या काळात त्यांनी अनेक वैद्यकीय उपचारांचा तसेच गर्भधारणेतील अडचणींचा सामना केला. अनेक अपयशांनंतर अखेर त्यांच्या आयुष्यात ही आनंदाची बातमी आली आहे.
अभिनेत्रीने समाजमाध्यमांवर काही छायाचित्रे शेअर करत ही बातमी जाहीर केली. एका छायाचित्रात त्या पतीसोबत आनंद व्यक्त करताना दिसतात, तर दुसऱ्यात बाळाचे प्रतीकात्मक चित्र आहे. आणखी एका छायाचित्रात त्यांच्या पाळीव कुत्र्याची झलक दिसते. या सर्व छायाचित्रांद्वारे त्यांनी आपल्या आयुष्यातील या नव्या प्रवासाची सुरुवात चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. या आनंदवार्तेसोबत त्यांनी भावनिक शब्दांत आपली भावना व्यक्त करत, प्रेम, आशा आणि संयमाच्या प्रवासानंतर हा क्षण साकार होत असल्याचे सांगितले. चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचे स्वागत होणार आहे.