दत्तात्रेय काळे
उमरखेड,
panganga river तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या गावांवर यंदाही भीषण पाणीटंचाईचे सावट दाटले आहे. ‘नदी गावात, पाणी डोळ्यांत’ अशी हतबल करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी, परिसराची जीवनदायिनी असलेली पैनगंगा नदी आज पूर्णपणे कोरडी पडली आहे.
ज्या नदीने पिढ्यान्पिढ्या गावांची तहान भागवली, तीच नदी आता वाळवंटासारखी कोरडी पडलेली पाहून ‘धरण उशाला कोरड घशाला’ म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.सहस्रकुंड धबधब्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर मुरली गावालगत 2006 साली 2 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला बंधारा पूर्णतः कोरडा पडला आहे. या बंधाèयात पाण्याचा एक थेंबही नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ईसापूर धरणातून सोडले panganga river जाणारे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत चालली आहे. लिंगी, देवरंगा, मंगरूळ, वाळकी, परोटी, इस्लापूर, मुरली व मुरली तांडासह अनेक गावांमध्ये पाण्यासाठी अक्षरशः भटकंती सुरू आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायी चालावे लागत आहे. कोरड्या पडलेल्या नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे खोदून, ओलसर मातीतून पाणी गोळा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
या भागात पैनगंगा अभयारण्य असल्याने वन्य प्राण्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे. जंगलातील पाणवठे आटल्याने प्राणी तहानेने व्याकुळ होऊन मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची भीती वाढली आहे. दुसरीकडे, जनावरांसाठी पाणी नसल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या झळा बसताच ही समस्या उग्र रूप धारण करते, मात्र ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना अद्यापही दिसून येत नाहीत. प्रशासनाचे प्रयत्न अपुरे ठरत असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे.
धरणाचे पाणी सोडण्यात विदर्भावर अन्यायच !
ईसापूर धरण आद्य panganga river क्रांतिवीर नवसाजी नाईक जलाशय या नावाने ओळखले जात असून या धरण उभारणीसाठी 45 गावांतील भूसंपादन करण्यात आले होते. यवतमाळ, नांदेड, हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर हे धरण असून 1971 ते 1982 दरम्यान धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. धरणाचे जवळपास 80 टक्के पाणी मराठवाड्याला दिले जाते. केवळ 20 टक्के पाण्यावर विदर्भाची बोळवण केल्या जात आहे. पैनगंगा नदीला नैसर्गिक पूर अथवा कृत्रिम पूर आला तरीही त्यामध्ये सर्वाधिक नुकसान मात्र विदर्भाचे होते.