“मेहनतीने पैसे कमावतोय, खिल्ली उडवून नाही

ट्रोलिंगला राहुल रॉयचे प्रत्युत्तर

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
मुंबई
Rahul Roy  ‘आशिकी’मुळे घराघरात पोहोचलेले अभिनेता राहुल रॉय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. एका कंटेंट क्रिएटरसोबत त्यांनी शूट केलेल्या काही रील्समुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. या व्हिडीओंमध्ये त्यांच्या अभिनयावर आणि हावभावांवर अनेकांनी टीका करत प्रश्न उपस्थित केले होते. “असा कोणता नाईलाज होता, ज्यामुळे असे रील्स करावे लागले?” असा सवालही अनेक नेटकऱ्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर राहुल रॉय यांनी अखेर सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 

Rahul Roy  
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक अडचणींबद्दल मोकळेपणाने सांगितले. “मी माझं काम प्रामाणिकपणे आणि विनम्रतेने करतो. मला काही कायदेशीर प्रकरणांमध्ये पैसे द्यायचे आहेत आणि ही प्रकरणं नवीन नाहीत. ही त्या काळातील आहेत, जेव्हा मला ब्रेन स्ट्रोक आला नव्हता,” असे त्यांनी नमूद केले. आपल्या परिस्थितीची खिल्ली उडवणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “जर तुम्ही माझ्या साधेपणाची किंवा माझ्या समस्यांची खिल्ली उडवत असाल, तर ते माझ्याबद्दल कमी आणि तुमच्याबद्दल अधिक सांगते .”राहुल रॉय यांनी पुढे नेटकऱ्यांना आवाहनही केले आहे. “जर तुम्हाला खरंच इतकी चिंता असेल, तर मला एखादं चांगलं आणि योग्य काम मिळवण्यात मदत करा, जेणेकरून मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकेन,” असे त्यांनी म्हटले. त्यांनी आपल्या मेहनतीचा अभिमान व्यक्त करत सांगितले की, “कमीत कमी मी मेहनत करून पैसे कमावतोय, दुसऱ्यांची खिल्ली उडवून नाही.”
दरम्यान, संबंधित रील्स Rahul Roy  एका महिला कंटेंट क्रिएटरने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या व्हिडीओंमध्ये राहुल रॉय त्यांच्या लोकप्रिय गाण्यांवर अभिनय करताना दिसतात. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरचा संकोच आणि कमी हावभाव यामुळे हे व्हिडीओ चर्चेचा विषय ठरले. एकीकडे ती महिला उत्साहाने नृत्य आणि अभिनय करताना दिसते, तर दुसरीकडे राहुल रॉय शांत आणि स्थिर उभे असल्याचे या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळते.
या संपूर्ण प्रकरणानंतर राहुल रॉय यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ट्रोलिंगच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. त्यांच्या प्रामाणिक कबुलीजबाबाने काहींनी सहानुभूती व्यक्त केली आहे, तर काहींनी सोशल मीडियावरील टीकेच्या मर्यादांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.