इस्लामाबाद,
Shahbaz Sharif's shocking revelation अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानसमोर या युद्धामुळे आणखी गंभीर आर्थिक आव्हाने उभी राहिली आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत बोलताना शरीफ यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत देशाने जी काही आर्थिक प्रगती साधली होती, ती या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर मागे गेली आहे. पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी आणि शांततेसाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
युद्ध सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम पाकिस्तानवर झाला आहे. यापूर्वी आठवड्याला सुमारे ३०० दशलक्ष डॉलर्स इतका असलेला तेल खर्च आता वाढून सुमारे ८०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष पथक कार्यरत असून, या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.याच बैठकीत त्यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेबाबतही माहिती दिली. इस्लामाबादमध्ये ११ एप्रिल रोजी सुरू झालेल्या चर्चेला २१ तास चालले होते आणि सध्या दोन्ही देशांमध्ये तात्पुरती शस्त्रसंधी लागू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका बजावत प्रादेशिक स्थैर्य राखण्यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या अलीकडील दौऱ्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, चर्चेच्या पुढील टप्प्यासाठी ते पाकिस्तानात आले होते आणि त्यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. पुढे ओमानमधील बैठका सकारात्मक झाल्याचे संकेत मिळाले असून, लवकरच यावर पुढील सकारात्मक घडामोडी घडतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.हा संघर्ष लवकरच थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त करत पाकिस्तान पुन्हा एकदा अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची पुढील फेरी आयोजित करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.