मालेगाव,
malegao accident वाशीम - अकोला महामार्गावरील मेडशी बायपासजवळ आज, ३० एप्रिल सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने येणार्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू गाडीला पाठीमागून जोरात धडक दिली. या भीषण अपघातात हळद काढणीच्या कामासाठी जाणार्या १० महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मेडशी येथील काही महिला मजूर जवळच असलेल्या रिधोरा येथे हळद काढणीच्या कामासाठी जाण्यासाठी ‘मॅझिमो’ (एमएच-०८ एजी -०९६७) या वाहनात बसून होत्या. हे वाहन रस्त्याच्या कडेला उभे असतानाच, वाशीम कडून अकोल्याच्या दिशेने अत्यंत वेगाने जाणार्या टाटा हॅरियर कार (जीजे-१९ बीजे -२०००) या वाहनाने उभ्या वाहनाला पाठीमागून भीषण धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टाटा हॅरियर कार रस्त्यावरच उलटली, तर उभ्या असलेल्या वाहनाचाही चक्काचूर झाला. यामध्ये वाहनात बसलेल्या १० महिलांना गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.malegao accident सर्व जखमी महिलांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे वाशीम आणि अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमी महिला मेडशी येथील रहिवासी असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरीच्या कामाला जात असताना हा अपघात घडला. महामार्गावरील वाहनांच्या वाढत्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.