तभा वृत्तसेवा
वणी,
stem cell ‘दिल से’ फाऊंडेशन, टीटीएमएस वणी विदर्भ शाखा आणि डीकेएमएस स्टेम सेल दाता नोंदणी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्टेम सेल जनजागृती व दाता नोंदणी मोहीम यशस्वीपणे पार पडली.
ही मोहीम वणीसह वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी राबविण्यात आली. रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर) यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना नवजीवन मिळवून देण्यासाठी स्टेम सेल दान अत्यंत महत्त्वाचे ठरते, असे दिल से फाऊंडेशनचे मुख्य सेवक करण शाह यांनी सांगितले.
‘सेवा हीच स्तुती’ हे ब्रीदवाक्य जोपासत दिल से फाऊंडेशनमार्फत यापूर्वीही वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे यांसारखे विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण विदर्भात यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.
या दरम्यान एकूण 177 stem cell इच्छुकांनी ‘स्टेम सेल दाता’ म्हणून नोंदणी केली. भविष्यात अशा जनजागृती मोहिमा अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यात येतील, अशी ग्वाही करण शाह यांनी दिली. मोहिमेसाठी विदर्भप्रमुख अभय पुणेवार, अशोक जुमले, रमेश चंदनकर, प्रिया श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनात अरुण पटेल, तेजल, दर्शन, विजय, दिलीप, आशुतोष, अनिल, उमेश यांनी परिश्रम घेतले.