चंद्रपूर,
census सन 2011 च्या जनगणनेनंतर तब्बल 15 वर्षांनी 1 मे 2026 पासून जनगणनेला सुरुवात होत आहे. देशातील ही पहिलीच डिजीटल जनगणना असून, 1 ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वयंगणना करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जनगणना शुभारंभाच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवार, 30 एप्रिल रोजी सर्व यंत्रणेचा आढावा घेऊन सुचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, तहसीलदार विजय पवार, प्रभारी नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. विविध यंत्रणांनी आपापल्या क्षेत्रातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, सभापती आदींची स्वयं गणना करावी. तसेच नागरिकांनासुध्दा स्वयं गणनेसाठी प्रवृत्त करावे. अधिकारी, कर्मचार्यांचे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावे. जनगणनेबाबत शासन स्तरावरून रोजच आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नागरिकांनी दिलेली माहिती गुप्त ठेवली जाईल व केवळ जनगणना कार्यासाठीच वापरली जाईल. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती भरावी. तसेच 15 मे नंतर घरी आलेल्या प्रगणकाला सहकार्य करून या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अशी राहील स्वयंगणनेची प्रक्रिया
संकेतस्थळाला भेट द्या. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निवडा. कॅप्चा प्रविष्ट करा. कुटुंब प्रमुखाचे नाव. 10 अंकी भ्रमणध्वनी क्रमांक. ई- मेल आयडी असल्यास प्रविष्ट करा. कुटुंब प्रमुखाचे नाव नंतर बदलता येणार नाही. प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एकच भ्रमणध्वनी क्रमांक वापरावा.census एकदा नोंदणी झाल्यावर तोच क्रमांक इतर कोणत्याही कुटुंबासाठी वापरता येणार नाही. जिल्हा निवडा आणि परिसर, गाव, नगर व पीन कोड प्रविष्ट करा नकाशावर आपले निवासस्थान शोधा. प्रश्नावली पूर्ण करा. पूर्वावलोकन आणि पुनरावलोकन व अंतिमतः सादर करा. जेव्हा जनगणना गणक तुमच्या घरी भेट देईल, तेव्हा तुमचा एस. ई. आयडी त्यांना सांगा