प्रवासात क्रांती...रेल्वेने जोडला काश्मीर!

जम्मूपर्यंत वंदे भारतची सेवा सुरू

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
जम्मू,
Vande Bharat continues till Jammu जम्मू तवी आणि श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या आधुनिक वंदे भारत जलदगती रेल्वे सेवेचा विस्तार करत नवा टप्पा गाठण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते जम्मू तवी स्थानकावरून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून सेवेला प्रारंभ करण्यात आला. यापूर्वी ही सेवा केवळ श्री माता वैष्णो देवी कटरा ते श्रीनगरदरम्यान मर्यादित होती, मात्र वाढत्या प्रवासी मागणीमुळे ती आता जम्मूपर्यंत वाढवण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह तसेच जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला उपस्थित होते. या वेळी बोलताना रेल्वेमंत्र्यांनी ही सेवा काश्मीरला देशाच्या इतर भागांशी अधिक सक्षमपणे जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे कठीण डोंगराळ भागातूनही आधुनिक रेल्वे सुविधा उभारणे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.
 
 
 
Vande Bharat
या सेवेमुळे जम्मू ते श्रीनगर हा प्रवास आता अधिक वेगवान आणि सोयीस्कर झाला आहे. पूर्वी रस्त्याने हा प्रवास पूर्ण करण्यासाठी दहा ते बारा तास लागत असत, तर आता ही रेल्वे सुमारे पाच तासांत हे अंतर पार करणार आहे. जवळपास दोनशे सत्तेचाळीस किलोमीटरचे अंतर कमी वेळेत पार होणार असल्याने प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होणार आहे.या मार्गासाठी तयार करण्यात आलेली वंदे भारत रेल्वे थंड हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विशेष रचनेत साकारण्यात आली आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करून तिची आसन क्षमता देखील वाढवण्यात आली आहे. आधुनिक सुरक्षा यंत्रणा, प्रगत माहिती व्यवस्था आणि आरामदायी आसन व्यवस्था यामुळे प्रवास अधिक सुखद होणार आहे.
 
 
या रेल्वे सेवेच्या प्रारंभामुळे जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटन क्षेत्राला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देशभरातून तसेच परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना आता थेट रेल्वेने जम्मूपर्यंत पोहोचून श्रीनगरच्या निसर्गरम्य परिसरात जाणे अधिक सोपे होणार आहे. नियमित प्रवाशांसाठी ही सेवा लवकरच सुरू होणार असून आठवड्यातील बहुतेक दिवस ही रेल्वे धावणार आहे.