मुंबई
Dhurandhar 2 भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या रणवीर सिंग आणि दिग्दर्शक आदित्य धर यांची जोडी प्रचंड चर्चेत असून, त्यांच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. अवघ्या १६ दिवसांत या चित्रपटाने जगभरात १५०० कोटी रुपयांचा टप्पा पार करत भारतीय सिनेमातील सर्वात वेगवान कमाई करणारा चित्रपट होण्याचा मान पटकावला आहे.
शुक्रवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या १६व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ नोंदवली गेली. गुरुवारच्या तुलनेत जवळपास १७.८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. त्या दिवशी ‘धुरंधर २’ने देशभरातील १३,३३० शोजमधून २१.५५ कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे भारतातील चित्रपटाचे एकूण सकल कलेक्शन १,१४८ कोटी रुपयांवर, तर निव्वळ कलेक्शन ९५९.३७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
विदेशतील कमाईतही चित्रपटाने Dhurandhar 2 चांगली कामगिरी केली आहे. विदेशात ५ कोटींची भर पडत एकूण विदेशी कलेक्शन ३७५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यासह चित्रपटाचे जागतिक उत्पन्न १,५२३.५८ कोटी रुपयांवर गेले आहे.भाषानिहाय पाहता, हिंदी आवृत्तीने सर्वाधिक २०.२५ कोटींची कमाई केली असून तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम आवृत्त्यांनीही समाधानकारक कामगिरी केली आहे. विविध भाषांमधील हा प्रतिसाद चित्रपटाच्या सर्वव्यापी लोकप्रियतेचे द्योतक मानला जात आहे.
या यशामुळे ‘धुरंधर २’ने भारतीय चित्रपटसृष्टीतील काही मोठ्या विक्रमांना मागे टाकले आहे. याआधी दंगल, बाहुबली २ आणि पुष्पा २ या चित्रपटांनीच १५०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. मात्र, हा टप्पा गाठण्यासाठी ‘दंगल’ला जवळपास ३० दिवस, तर ‘बाहुबली २’ला २० दिवसांहून अधिक कालावधी लागला होता. त्या तुलनेत ‘धुरंधर २’ने केवळ १६ दिवसांत हा विक्रम नोंदवला आहे.