वर्धा
Jamnalal Bajaj Seva Trust Wardha माणसाच्या डोळ्यांतील पाणी आणि शेतात शिरणारे पाणी, या दोन्ही गोष्टी वेदनाच देतात. हिंगणघाट लगतच्या इटलापूर शिवारातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून याच वेदनेचा सामना करत होते. जो नाला शेतीची तहान भागवण्यासाठी असायला हवा होता, तोच नाला गाळामुळे उथळ होऊन शेतकर्यांच्या स्वप्नांना जलसमाधी देत होता. अखेर जमनालाल बजाज सेवा ट्रस्टच्या माध्यमातून नाल्याच्या खोलिकरणाने शेतशिवार पाणीदार झाले.
Jamnalal Bajaj Seva Trust Wardha हिंगणघाट लगतच्या इटलापूर गावापासून एक मोठा नाला वाहत असून तो वणा नदीला जाऊन मिळतो. या नाल्याच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणात शेती आहे. अनेक वर्षांपासून या नाल्याचे खोलीकरण झाले नसल्याने पावसाळ्यात नाल्याचे पाणी शेतात शिरले की, पिकांचे नुकसान व्हायचे. परिणामी, नाल्यालगतची जमीन अनेक वर्षांपासून पडीक होती. जर जलमार्गच अडवलेले असतील तर पाण्याला आजूबाजूच्या शेतात शिरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही, हे शेतकर्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जमनालाल बजाज सेवा ट्रस्टशी संपर्क साधला. शेतकर्यांच्या हाकेला प्रतिसाद देत १० टके लोकसहभागातून अवघ्या महिनाभरात अडीच किमी लांबीच्या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले.
Jamnalal Bajaj Seva Trust Wardha महिन्याभरात अडीच किमी लांब नाल्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. नाल्याची रुंदी २५ मीटर असून दीड मीटर खोली आहे. यातून काढलेली माती काठावरच टाकल्याने पावसाळ्यातील पाणी अडविले जाणार आहे. या खोलिकरणामुळे केवळ नाला स्वच्छ झाला नाही, तर २० ते २५ शेतकर्यांची जवळपास ३०० एकर जमीन वाहितीखाली आली असून त्यांना सिंचनाचीही सोय झाली आहे. त्यामुळे पडीत जमिनीवर पिके डोलणार असून शेतकरी दुबार पीक घेण्यासही सज्ज झाले आहेत.
Jamnalal Bajaj Seva Trust Wardha नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामातून शेतकर्यांच्या चेहर्यावर हास्य फुलविण्याचा आमचा प्रयत्न आहे. इटलापूर येथील शेतकर्यांच्या मागणीनुसार नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, हे संपूर्ण काम २० लाखांपेक्षा कमी खर्चात पूर्ण झाले, अशी प्रतिक्रीया जमनालाल बजा सेवा ट्रस्ट वर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भार्गव यांनी दिली.