८ गटसचिव वेतनाविना; संघटना आक्रमक

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ४८ गट सचिवांना मागील अनेक वर्षांपासून वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने Gat sachiv sanghatana गट सचिव संघटना आता आक्रमक भूमिकेच्या तयारीत आहे. जिल्ह्यातील गट सचिव मागील ९ वर्षांपासून प्रलंबित वेतनासाठी सातत्याने निवेदने देत आहेत. अनेकवेळा आंदोलनही करण्यात आली. विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन समस्या सांगण्यात आल्या. मात्र, अद्याप त्यांची वेतनाची समस्या जैसे थे आहे. थकीत वेतनासाठी सुमारे १२ कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी एकही रुपया अद्याप मंजूर झालेला नाही. सदर समस्या निकाली निघावी या हेतूने गट सचिव संघटनेने कामगार न्यायालयाचे दार ठोठावले.
 
 
money
 
न्यायालयाने Gat sachiv sanghatana गट सचिवांच्या बाजूने निर्णय देऊन वेतन देण्याचे आदेश दिले. पण, प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप संघटनेचा आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी तीन गट सचिवांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर प्रशासन या प्रश्नाकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा होती. पण परिस्थितीत कुठलाही बदल झाला नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवृत्त कर्मचार्‍यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पण, त्यात गट सचिवांचा समावेश नाही. त्यामुळे गटसचिवांमध्ये रोष वाढत आहे. २६ जानेवारी २०२६ लाही गट सचिवांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रशासनाने चर्चेद्वारे वेतनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे वास्तव आहे.
 
 

थकीत वेतनासाठी आम्ही लढा देत आहो. पण अजूनही वेतन अदा करण्यात आलेले नाही. आता गट सचिव संघटना तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर गटसचिवांने वेतन अदा करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी, अशी मागणी गट सचिव संघटनेचे अध्यक्ष महेंद्र ठाकूर यांनी केली आहे.