एनईपी विकसित भारताची पृष्ठभूमी

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
- अतुल कोठारी यांचे प्रतिपादन
- 'विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण' विषयावर महाराष्ट्र ज्ञानसभा

नागपूर, 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) हे विकसित भारताची भक्कम पायाभरणी करणारे असल्याचे प्रतिपादन शिक्षण संस्कृती उत्थान न्यास, नवी दिल्लीचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, व्हीएनआयटी आणि आयआयएम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'Maharashtra Gyan Sabha' ‘महाराष्ट्र ज्ञानसभा’मध्ये ते बीजभाषण करत होते.
 
 
NEP
कोठारी यांनी भारतीय शिक्षणाच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करताना नालंदा, तक्षशिला यांसारख्या विद्यापीठांनी जगाला ज्ञान दिल्याचे सांगितले. मात्र सध्याच्या काळात शिक्षण क्षेत्रात उलट प्रवाह दिसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ भौतिक प्रगती म्हणजे विकास नसून नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा समतोल आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या भारतीय संकल्पनांवर आधारित समग्र विकासाची गरज त्यांनी अधोरेखित केली.
नवीन शिक्षण धोरण भारतकेंद्रित असून विद्यार्थ्यांना लवचिकता, कौशल्याधारित शिक्षण आणि मातृभाषेतील शिक्षणावर भर देते. अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण स्थानिक भाषांमध्ये देण्याची गरज त्यांनी मांडली. औपनिवेशिक मानसिकतेतून बाहेर पडून भारतीय ओळख जपणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
'Maharashtra Gyan Sabha'  दुसऱ्या सत्रात ‘एनईपीच्या परिप्रेक्ष्यात शैक्षणिक परिवर्तन व गव्हर्नन्स’ या विषयावर चर्चासत्र झाले. अध्यक्षस्थानी डॉ. शशिकला वंजारी होत्या. डॉ. उज्वला चक्रदेव, डॉ. विलास सपकाळ, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. प्रशांत गुप्ता आदी मान्यवरांनी सहभाग घेतला.
वक्त्यांनी शिक्षणातील गुणात्मक बदल, मूल्याधारित शिक्षण, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन यावर भर दिला. “हलके, तरीही कडक नियमन” या संकल्पनेद्वारे प्रभावी गव्हर्नन्सची गरज अधोरेखित करण्यात आली. समावेशक निर्णयप्रक्रिया, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धती आणि २१व्या शतकातील कौशल्यांचा विकास हे विकसित भारतासाठी महत्त्वाचे घटक असल्याचे मत व्यक्त झाले.
डॉ. उज्वला चक्रदेव यांनी करुणा आणि नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षणाची गरज सांगितली, तर डॉ. प्रशांत गुप्ता यांनी संशोधन, प्रशिक्षण आणि नेतृत्व हे संस्थात्मक उत्कृष्टतेचे स्तंभ असल्याचे नमूद केले.
एकूणच, शिक्षणात गुणात्मक व मूल्याधारित बदल घडवूनच ‘विकसित भारत’ हे ध्येय साध्य होऊ शकते, असा एकमुखी निष्कर्ष महाराष्ट्र ज्ञानसभेतून पुढे आला.