- नव्या अभ्यासक्रमातून अनुभवाधारित शिक्षणाला प्राधान्य
नागपूर,
CBSE's skill-based education शालेय शिक्षणातील पारंपरिक ‘पोपटपंची’ पद्धतीला आता अलविदा करण्याची वेळ आली असून, विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती आणि कौशल्यांवर आधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) ने २०२६-२७ शैक्षणिक सत्रासाठी नवीन अभ्यासक्रम जाहीर केला आहे.
नुकताच जारी केलेल्या परिपत्रकानुसार, इयत्ता ११वी आणि १२वीचा अभ्यासक्रम १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे, तर इयत्ता ९वी आणि १०वीचा अभ्यासक्रम २ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. हा अभ्यासक्रम संपूर्ण शैक्षणिक वर्षभर लागू राहणार असून, सर्व संलग्न शाळांना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक असेल.
या नव्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतर करण्याऐवजी विषय समजून घेणे, त्याचे विश्लेषण करणे आणि प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग करणे यावर भर दिला आहे. विशेषतः इयत्ता नववीमध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३ (एनसीएफ-२०२३) आधारित अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. यामध्ये क्षमता-आधारित, अनुभवात्मक आणि सर्वांगीण विकासावर आधारित शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे.
CBSE's skill-based education दरम्यान, २ एप्रिल रोजी नवी दिल्लीतील सीबीएसई मुख्यालयात आयोजित वेबिनारमध्ये शाळांच्या प्रतिनिधींना या बदलांची सविस्तर माहिती देण्यात आली. शिक्षकांचे प्रशिक्षण, तसेच पालकांना नव्या प्रणालीची माहिती देण्यासाठी विशेष बैठका आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बोर्डाने सर्व शाळांना शैक्षणिक पोर्टलवरून “अभ्यासक्रम २०२६-२७” डाउनलोड करून शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचेही आदेश दिले आहेत. या बदलामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक समजूतदार, उपयुक्त आणि कौशल्याधारित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.