खरिपासाठी १.१७ लाख मेट्रिक टन खताची मागणी

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
५२ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध
 
वर्धा, 
Demand for fertilizer for Kharif आगामी खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर कृषी विभागाच्यावतीने नियोजन केले जात आहे. सध्या शेतकर्‍यांची उन्हाळवाहीच्या कामांसाठी लगबग सुरू आहे. यंदा खरीप हंगामासाठी १ लाख १७ हजार २२० मेट्रिक टन खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत मागील शिल्लक व नव्याने प्राप्त असे एकूण सुमारे ५२ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्यात उपलब्ध असल्याची माहिती आहे.
 
 
khat
 
शेतकर्‍यांना खताची कमतरता भासू नये आणि पुरेशा प्रमाणात रासायनिक खत उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. यंदा खरीप हंगामात सुमारे ४ लाख १५ हजार ९२९ हेटर क्षेत्रात पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये २ लाख २१ हजार ८३१ हेटरवर कपाशी, १ लाख ३१ हजार ७९४ हेटरवर सोयाबीन तर ६० हजार ८६८ हेटरवर तूर पिकाची लागवड होणार, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. याशिवाय ज्वारी, मका, तीळ, मूग, उडीद व भुईमुंग आदी पिकांची लागवडही जिल्ह्यातील शेतकरी खरीपात करतात. शेतकर्‍यांना खत व बियाण्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार असल्याने कृषी विभागाने वरिष्ठ स्तरावर पुरेशा खताची मागणी नोंदविली आहे.
 
 
Demand for fertilizer for Kharif  सध्या जिल्ह्यातील शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहे. मागीलवर्षी प्रतिकूल हवामानामुळे कापूस, सोयाबीन व तूर पिकांचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. त्यातच बाजारपेठेत शेतकर्‍यांच्या शेतमालाला कमी भाव मिळाल्याने शेतकर्‍यांचा खर्चही भरून निघाला नाही. खत, बियाणे व इतर कृषी साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. खरीप हंगामासाठी खत पुरवठा प्रक्रिया सुरू झाली असून बियाण्यांची विक्री मे महिन्यापासून सुरू होणार आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, खरीप हंगामासाठी युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी आणि संयुत खत मिळून एकूण १ लाख १७ हजार २२० मेट्रिक टन खताची मागणी आहे. सध्या विभागाकडे ५२ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. त्यात सर्व प्रकारच्या खतांचा समावेश आहे.
 
 

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात रासायनिक खत उपलब्ध करून दिले जाईल. खताचा पुरवठा सुरू झाला आहे, मे महिन्यात बियाण्यांचाही पुरवठा सुरू होईल. यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना खत व बियाण्यांची टंचाई भासणार नाही, अशी प्रतिक्रीया जिपचे कृषी विकास अधिकारी शिवा जाधव यांनी दिली.
 
 

युरिया : ३६७५० मे. टन
डीएपी : १३२४० मे. टन
एमओपी : २८५० मे. टन
एसएसपी : २८२५० मे. टन
संयुक्त : ३५८३० मे. टन