आदिवासी भागात शिक्षणासाठी ठोस कृती गरजेची

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र ज्ञान सभेत 'आदिवासी प्रदेशात सर्वसमावेशक शिक्षण उपलब्धता' विषयावर विशेष चर्चासत्र

नागपूर, 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र ज्ञान सभेत ‘आदिवासी आणि दुर्गम प्रदेशात सर्वसमावेशक शिक्षण उपलब्धता’ या विषयावर विशेष चर्चासत्रात शिक्षणासह सामाजिक विकासासाठी ठोस कृती आराखड्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
 
 
Manali
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू Dr. Manali Kshirsagar डॉ. मनाली क्षीरसागर होत्या. त्यांनी सांगितले की, केवळ धोरणे तयार करून उपयोग होत नाही. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देणे आवश्यक आहे. आज शिक्षण क्षेत्रात प्रगती दिसत असली तरी शिक्षण सोडण्याचे प्रमाण आणि समावेशकतेचा अभाव चिंताजनक आहे. “बोलणे आणि कृती यातील अंतर कमी करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये शिक्षण पोहोचवताना स्थानिक भाषा, संस्कृती आणि परंपरा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या भागांतील पायाभूत सुविधांचा अभाव, भाषा अडथळे आणि शिक्षणाची मर्यादित पोहोच ही मोठी आव्हाने आहेत. सुमारे ४० टक्के लोकसंख्या अशा भागांत राहत असल्याने शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रत्यक्ष काम आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
Dr. Manali Kshirsagar  या चर्चासत्रात शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाचे ओमप्रकाश शर्मा यांनी ग्रामीण व आदिवासी भागातील शैक्षणिक उपक्रमांवर प्रकाश टाकला. शिक्षणासोबतच जागरूकता, नैतिक मूल्ये आणि सामाजिक सहभाग वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गोंडवाना विद्यापीठाचे डॉ. मनीष उत्तरवार यांनी शिक्षणासोबत आरोग्यविषयक प्रकल्पांची माहिती देत ग्रामीण भागात आरोग्यसेवा आणि साक्षरतेत सुधारणा होत असल्याचे सांगितले.
एकूणच, सर्व घटकांच्या समन्वयातून आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारेच शिक्षण व सामाजिक विकासात सकारात्मक बदल घडवता येईल, असा निष्कर्ष या चर्चासत्रातून समोर आला.