नागभीड,
मोहफुल वेचण्यासाठी शेतात गेलेल्या एका Farmer dies in tiger attack शेतकर्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी नागभीड तालुक्यातील मिंथूर येथे घडली. रविवार, 5 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास शेतकर्याचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हरिदास महादेव कुबडे (58, रा. मिंथूर) असे मृतक शेतकर्याचे नाव आहे.
हरिदास कुबडे हे शनिवारी सकाळीच शेतात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते. मात्र, सायंकाळ होऊनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यांना बघण्यासाठी त्यांचा पुतण्या अक्षय हा सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास शेतात गेला असता, त्याला वाघाची जोडी आणि तीन बछडे दिसले. तो घाबरून गावात परत आला. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. माहिती कळताच वनविभाग व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. दरम्यान, रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असता, शेतात हरिदास कुबडे यांचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण असल्याने वाघाने हल्ला करून त्यांना ठार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
Farmer dies in tiger attack या परिसरात वाघ, वाघीण व त्यांच्या तीन पिल्लांचा वावर असल्याची चर्चा स्थानिकात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी मृतदेहाचे अवशेष विच्छेदनासाठी पाठवले असून, पुढील तपास वनविभाग व नागभीड पोलिस करीत आहेत. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.