फुलसावंगी बनले ‘जुगार केंद्र’

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
विदर्भ, मराठवाड्यासह तेलंगणातील जुगारी सक्रिय
पोलिसांच्या खुलेआम जुगार अड्डा
शेतात रंगतोय कोट्यवधींचा डाव

महागाव, 
'gambling center' यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. तालुक्यातील फुलसावंगी येथे सध्या जुगाराचा मोठा बाजार भरत असून, या अड्ड्यावर केवळ स्थानिकच नव्हे तर विदर्भ, मराठवाडा आणि चक्क तेलंगण राज्यातील जुगारी मोठ्या संख्येने हजेरी आहेत. विशेष म्हणजे, पोलिस प्रशासनाच्या वरदहस्तामुळेच हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. फुलसावंगी येथील ढाणकी रस्त्यावर असलेल्या साधू महाराज मंदिरापासून काही अंतरावर एका खाजगी शेतात हा जुगार अड्डा चालवला जात आहे. मुख्य रस्त्यापासून थोड्या अंतरावर आणि झाडाझुडपांच्या आडोशाला असलेल्या या ठिकाणी दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याची खात्रीलायक आहे.
 

jugar 
 (संग्रहित छायाचित्र )
 
'gambling center'  या अड्ड्याचे स्वरूप एखाद्या व्यावसायिक बाजारपेठेसारखे झाले असून याठिकाणी यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यांसह सीमेलगतच्या तेलंगण राज्यातील बडे जुगारी आलिशान गाड्यांमधून येथे दाखल होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असताना स्थानिक पोलिस प्रशासनाला याची माहिती नसावी, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. वरपासून खालपर्यंत सर्वांचे खिसे गरम जात असल्यामुळेच हा अड्डा बिनदिक्कत सुरू आहे, असा थेट आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. सामान्य जनतेने तक्रार करूनही पोलिसांकडून ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक केली जात असल्याची संतापजनक भावना आहे. या जुगार अड्ड्यामुळे परिसरातील शांतता भंग पावत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतातील या जुगारामुळे परिसरातील तरुणाईलाही व्यसन लागल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पोलिस प्रशासन झोपेतून जागे होऊन या अड्ड्यावर कारवाई करणार की ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असेच सुरू राहणार, याकडे संपूर्ण महागाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.