बंगळूरु
IndiGo bomb threat केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शनिवारी संध्याकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने काही काळ प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सखोल तपासणीनंतर ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले.
ही घटना सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. विमान उड्डाणासाठी सज्ज असतानाच एका प्रवाशाला विमानाच्या स्वच्छतागृहात टिश्यू पेपरवर लिहिलेली संशयास्पद चिठ्ठी आढळली. त्या चिठ्ठीत विमानात स्फोटक ठेवले असल्याचा उल्लेख होता. संबंधित प्रवाशाने तत्काळ ही माहिती केबिन क्रूला दिली.घटनेची गंभीरता लक्षात घेऊन विमानाच्या कॅप्टनने तात्काळ हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. सुरक्षा प्रोटोकॉलनुसार सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विमानाची कसून तपासणी सुरू केली.सुरक्षा तपासणीनंतर विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळले नाही. त्यामुळे ही धमकी केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच संध्याकाळी विमानाने पुन्हा उड्डाण केले IndiGo bomb threat आणि नियोजित गंतव्यस्थानी पोहोचले.दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, टिश्यू पेपरवर धमकीची चिठ्ठी लिहिणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे. विमानतळ प्रशासनाने अशा प्रकारच्या अफवांमुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण येतो, तसेच प्रवाशांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण होते, असे नमूद केले आहे.