अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

समृद्धी महामार्गावरील घटना

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
वर्धा,
Leopard dies नागपूरकडून मुंबईच्या दिशेने भरधाव जाणार्‍या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला धडक दिली. यात बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ६४.८८ परिसरात शनिवार ४ रोजी रात्री ११.५८ वाजताच्या सुमारास घडली.
 
 
Leopard dies
 
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी यांनी सहकार्‍यांसह समृद्धी महामार्गावरील दिग्रस भागातील चॅनल क्रमांक ६४ परिसर गाठला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक चौधरी व त्यांचे सहकारीही घटनास्थळी पोहोचले. Leopard dies त्यांनी मृत बिबट्याची पाहणी केल्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तविला. त्यानंतर मृत बिबट वर्धा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात आणण्यात आला. या ठिकाणी सहाय्यक वनसंरक्षक एम. के. आडे, मानद वन्यजीव संरक्षक कौशल मिश्र, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी, पीएफएचे अभिषेक खेडुलकर, क्षेत्र सहाय्यक ए. एल. जाधव, वनरक्षक ए. जी. गिते, वनरक्षक एम. एस. माने, करुणाश्रमचे आशिष गोस्वामी आदींच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय गिरी, डॉ. प्रणिता पानतावणे, डॉ. विलास मडावी, डॉ. हर्षा अंधारे यांनी बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर नियमानुसार बिबट्याला अग्नी देण्यात आली.
 
 
बिबट सुमारे अडीच वर्षांचा
रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडलेला बिबट हा सुमारे अडीच वर्ष वयोगटातील असून तो नर जातीचा असल्याचे वनविभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. Leopard dies सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पाणी व शिकारीच्या शोधार्थ तो समृद्धी महामार्ग ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली असावी आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकार्‍यांकडून वर्तविला जात आहे.