नवीन शैक्षणिक सत्रापासून लागू होणार ‘मेजर’ विषयांच्या रचनेतील बदल

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
- स्पष्ट मार्गदर्शक सूचनांचा अभाव कायम

नागपूर, 
'Major' subjects from the new academic session राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी नवीन शैक्षणिक सत्रापासून ‘मेजर’ विषयांच्या रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात तीन, द्वितीय वर्षात दोन आणि तृतीय वर्षात एक ‘मेजर’ विषय निवडण्याची संधी मिळणार आहे.
 
 
ngp uni
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) सध्या विद्यार्थ्यांना ‘मेजर’ आणि ‘मायनर’ विषय निवडावे लागतात. मात्र, आतापर्यंतच्या पद्धतीत विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातच एकच ‘मेजर’ विषय निवडावा लागत होता आणि तोच विषय तिन्ही वर्ष कायम ठेवावा लागत होता. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणासाठी पर्याय मर्यादित राहत होते. नव्या बदलामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचा अनुभव घेता येणार असून, अंतिम वर्षापर्यंत योग्य विषय निवडण्याची संधी मिळणार आहे.
अधिसभा सदस्य डॉ. राजेश भोयर यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. या बदलामुळे विद्यार्थ्यांना अधिक लवचिकता मिळेल आणि त्यांच्या करिअरच्या दृष्टीने योग्य निर्णय घेणे सोपे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
'Major' subjects from the new academic session  मात्र, या नव्या रचनेबाबत अद्याप स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू असले, तरी नेमके बदल कसे करायचे याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे अभ्यासक्रम आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विसंगती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महाविद्यालयांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. ‘थिअरी-प्रात्यक्षिक’ गुणांचे प्रमाण ६०:४० की ८०:२० असेल, याबाबत स्पष्टता नसल्याने प्रवेश प्रक्रियेतील माहितीपत्रके तयार करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नव्या पद्धतीची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी तातडीने स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी होत आहे.