खैबर पख्तुनख्वा,
pakistan-heavy-rain : वायव्य पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (PDMA) रविवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० दिवसांत पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये किमान ४५ जणांचा मृत्यू झाला असून १०५ जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये २३ मुलांचा समावेश
पीडीएमएच्या अहवालानुसार, २५ मार्चपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये मृतांमध्ये २३ मुले, १७ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये ४५ पुरुष, १६ महिला आणि ४४ मुलांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची छपरे आणि भिंती कोसळल्या असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
३८२ घरांचे अंशतः नुकसान
अहवालानुसार, ४४२ घरांवर परिणाम झाला असून, त्यापैकी ३८२ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे आणि ६० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. ही घरे दोन डझनांहून अधिक जिल्ह्यांमध्ये आहेत. PDMA च्या अहवालात पुढे म्हटले आहे की, बचाव आणि मदत कार्य सुरू असून, PDMA, रेस्क्यू ११२२, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित संस्था समन्वयाने काम करत आहेत.
९ एप्रिलपर्यंत पावसाचा इशारा पुन्हा कायम
PDMA च्या महासंचालकांनी इशारा दिला आहे की, प्रांताच्या अनेक भागांमध्ये ९ एप्रिलपर्यंत पुन्हा पाऊस सुरू राहू शकतो. या पार्श्वभूमीवर, पर्यटक आणि स्थानिकांना संवेदनशील भागांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.