प्लास्टिक खाल्ल्याने मृत्युमुखी पडलेल्या गोधनाची नुकसान भरपाई द्या
दिनांक :05-Apr-2026
Total Views |
पोहरादेवी ग्रामपंचायत कडे गोपालकांची मागणी
मानोरा,
Pohradevi Gram Panchayat तालुयातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे नुकत्याच पार पडलेल्या यात्रोत्सवा पश्चात मोठ्या प्रमाणात जमा झालेला प्लास्टिकचा कचरा खाऊन स्थानिक नागरिकांच्या अनेक गाई गुरे दगावले असून, या मयत गुरांच्या नुकसानाची भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन गोपालकांच्या वतीने ग्रापं प्रशासनाकडे देण्यात आले.
(संग्रहित छायाचित्र )
श्री रामनवमी दरम्यान तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे लाखोच्या संख्येने यात्रेकरू येतात जे आपली मनोकामना फेडण्यासाठी येथे पूजा विधि आणि प्रसाद करतात. प्रसाद खाल्ल्यानंतर प्लॅस्टिकच्या लाखोच्या संख्येत पत्रावळी, ग्लास, वाट्या अस्ताव्यस्त फेकून देतात त्यामुळे मंदिर परिसर आणि पोहरादेवी च्या आजूबाजूचा काही किमी परिघामध्ये या प्लास्टिकच्या पत्रावळी, ग्लास, वाट्या यांचा खच साचलेला असतो. स्थानिक गोपालकांचे गाईगुरे फेकून दिलेल्या अन्नासोबतच हे प्लास्टिक सुद्धा खाऊन घेत असल्यामुळे अपचनाची समस्या निर्माण होऊन अनेक गुरांच्या जीवावर हे खाणे बेतत असल्याची बाब समोर आलेली आहे. स्थानिक विजय नामदेव राठोड, सुनील रामचंद्र राठोड आणि लालसिंग केशरसिंग राठोड या गाई मरण पावलेल्या पशुपालकांनी घातक कचर्यामुळे आमची गुरे मृत्युमुखी पडले असून झालेल्या आर्थिक नुकसान पूर्णपणे स्थानिक ग्रापं प्रशासनाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. गुरे मृत्युमुखी पडल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई ग्रामपंचायत ने करून देण्याची लेखी मागणी गोमालकांनी केली आहे.